Home हवामान अंदाज राज्यात परवापासून पुन्हा चार दिवस पावसाचा अंदाज

राज्यात परवापासून पुन्हा चार दिवस पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढून शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.  या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज आहे.

दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळं पाच ते आठ एप्रिल दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ एप्रिलदरम्यान  कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवर्ल्ड न्यूज बुलेटिन

पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सात आणि आठ तारखेला  हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तर मुंबईत मात्र उकाडा वाढणार आहे. 

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी 38 ते 40 अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो.   मंगळवारी संपूर्ण विदर्भासह जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीडमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले.