अमरावती : जिल्ह्यातील म्हसाळा (अंजनगाव बारी) येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र माणिकराव मेटकर यांची यशोगाथा कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करणारी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या कुक्कुटपालन आणि सेंद्रिय शेतीच्या व्यवसायातून वर्षाला 15 कोटी रुपयांची उलाढाल गाठली आहे. त्यांच्या या गरुडझेपेची दखल थेट जागतिक पातळीवर घेतली गेली असून, त्यांना ब्रिटनमधील प्रतिष्ठेच्या ‘ऑक्सफर्ड विद्यापीठात’ मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले गेले.
शून्यातून विश्व निर्माण करणारी सुरुवात
एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या रवींद्र यांचा व्यावसायिक प्रवास अत्यंत खडतर होता. रवींद्र यांनी 1984 साली केवळ 100 कोंबड्यांपासून कुक्कुटपालनास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात यातून त्यांना महिन्याला अवघे 150 रुपये मिळत असत. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची शेती नव्हती. मात्र, 1995 मध्ये त्यांच्या आईला चांदूर बाजार येथे वारसाहक्काने मिळालेली 4 एकर जमीन त्यांनी 80 हजार रुपयांना विकली. या पैशांतून त्यांनी बडनेरा (अमरावती) येथे 1 एकर जागा खरेदी केली. ‘बँक ऑफ इंडिया’कडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी 4 हजार कोंबड्यांचा व्यवसाय उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यावसायिक भरारीला सुरुवात झाली.
संकटांवर मात आणि 15 कोटींचा टप्पा
सन 2006 पर्यंत त्यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या 20,000 वर पोहोचली होती. पण बर्ड फ्लूच्या संकटामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तरीही खचून न जाता त्यांनी 2008 मध्ये 25 लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय नव्याने उभा केला. आज त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत. ज्या शेतकऱ्याकडे एकेकाळी कपडे घेण्यासाठीही पुरेसे पैसे नसत, त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. आज ते त्यांच्या मजुरांना दरमहा तब्बल 60 लाख रुपये मजुरी देतात. याशिवाय ते सेंद्रिय शेतीमध्येही अत्यंत यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना ‘किसान ऑफ इंडिया सन्मान 2025’ (अॅग्री-स्टार्टअप श्रेणी) देऊन गौरवण्यात आले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स
रवींद्र मेटकर यांच्या या अफाट यशाची आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळवलेल्या प्रगतीची दखल थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. ग्लोबल इकॉनॉमिक फोरम आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने 1 ते 5 मे 2026 दरम्यान आयोजित केलेल्या ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्समध्ये कृषी उद्योजक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले. या परिषदेत त्यांनी ‘एआय फॉर एव्हरी माइंड’ या संकल्पनेवर जगभरातील तज्ज्ञांना मार्गदर्शन केले.
सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षमय
रवींद्र मेटकर यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षमय आणि आर्थिक विवंचनेचा होता. उच्च शिक्षण घेऊनही सुरुवातीला हातात पैसा नसल्यामुळे त्यांना स्वतःचे साधे कपडे घेण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही मित्र किंवा नातेवाईकांकडून वारंवार पैसे उसणे (उसनवारी) घ्यावे लागत असत. 1984 च्या दरम्यान जेव्हा त्यांनी घराच्या छतावर अवघ्या 100 कोंबड्यांपासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांना यातून महिन्याला जेमतेम 150 रुपये उत्पन्न मिळत होते. खिशात दमडी नसताना, राहण्यासाठी स्वतःची पुरेशी जागा नसताना आणि डोक्यावर उसनवारीचा भार असतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही; उलट याच भीषण गरिबीच्या आणि संघर्षाच्या अनुभवांनी त्यांना शून्यातून 15 कोटींचे व्यावसायिक साम्राज्य उभे करण्याची प्रबळ प्रेरणा दिली.












