हॅपनिंग

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

मुंबई – इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किमती उसळल्या आहेत आणि त्याचा थेट फटका कृत्रिम धाग्यांना (MMF) बसत आहे. पॉलिएस्टरसारखे मानवनिर्मित धागे पेट्रोकेमिकल्सपासून बनतात, त्यामुळे कच्चे तेल महागले की, या धाग्यांची किंमतही आपोआप वाढते. गेल्या काही आठवड्यांत पॉलिएस्टर फायबरच्या किमतींमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. परिणामी, वस्त्रोद्योग क्षेत्र पुन्हा एकदा नैसर्गिक कापसाकडे वळू लागले आहे आणि यातच भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक मोठी सुवर्णसंधी दडली आहे. महागड्या कृत्रिम धाग्यांना पर्याय म्हणून कापसाला नवी मागणी येत असल्याने भावात तेजी येण्याची शक्यता आहे.

 

 

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) चे अध्यक्ष विनय एन. कोटक यांच्या मते, या परिस्थितीत 2025-26 हंगामात कापसाची एकूण खपत पूर्वीच्या अंदाजापेक्षा तब्बल 10 लाख गाठी जास्त होऊ शकते. कृत्रिम धागे महाग झाल्याने अनेक टेक्सटाइल युनिट्स आता कापसाकडे परत येत असून चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाममधून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस उत्पादकांना याचा थेट फायदा मिळू शकतो.

 

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे ट्रेंड वरच्या दिशेने आहेत. मध्य-पूर्व आणि आग्नेय आशियातून कापसाला मोठी मागणी असते, मात्र इराण युद्धामुळे तेथील उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे भारत आणि ब्राझीलकडून होणाऱ्या कापूस पुरवठ्याला जागतिक बाजारात जास्त महत्त्व येत आहे. शिवाय, USDA च्या अंदाजानुसार, एकूणच जागतिक कापूस उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे, जे भारतीय कापसाच्या भावाला आणखी आधार देईल.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

Related Articles

Back to top button