हॅपनिंग

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे राज्यातील द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसत आहे. हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रतीक्षेत अडकले असून, कोट्यवधी रुपयांच्या परकीय चलनाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रमजान काळातील वाढती मागणी आणि विस्कळीत पुरवठा यामुळे दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट झाले आहेत. नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांची ही संधी हुकली असून थांबलेल्या निर्यातीला त्यांना 1,500 कोटींचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

बंदरात अडकलेले कंटेनर
JNPT बंदरावर नाशिकचे कांदा आणि द्राक्षांचे 200 कंटेनर अडकले आहेत. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर रजिस्ट्रेशन बंद झाल्याने निर्यात प्रक्रिया पूर्णतः थांबली आहे. जर युद्ध लवकर थांबले नाही, तर सांगली जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष उत्पादकांना अंदाजे 1,500 कोटी रुपयांपर्यंत निर्यातीत फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रमजानची संधी हुकली!
रमजानच्या काळात नाशिकच्या द्राक्षांना आखाती देशांत मोठी मागणी असते. मात्र युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे दुबईमध्ये शेतमालाचे दर एका रात्रीत तिप्पट वाढले आहेत, पण विस्कळीत पुरवठा साखळीमुळे निर्यातदारांना या संधीचा फायदा घेता येत नाही.

 

Jain Irrigation

 

हवाई व समुद्री मार्ग दोन्ही बंद
नाशिकमधून दुबईसह अन्य आखाती देशांमध्ये विमानाद्वारे होणारी कार्गो सेवा दोन दिवसांपासून ठप्प पडली असून, कृषिमाल तसेच औद्योगिक साहित्याच्या निर्यातीला मोठा फटका बसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली असून, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे स्थगित झाल्याने हवाई मार्गे होणारा व्यापारही पूर्णपणे ठप्प आहे.

उत्पादन कमी, तरी दर मिळेना
यंदा द्राक्ष उत्पादन गतवर्षापेक्षा कमी आहे. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार हजार कंटेनरइतकी द्राक्ष निर्यात होत असते, यंदा ती अकराशे कंटेनरच्या आसपासच झाल्याचे दिसून येते.

आंबा निर्यातीवरही युद्धाचे काळे ढग
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, “सध्याची युद्धस्थिती कायम राहिली, तर केवळ निर्यातच नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होईल.” विशेषतः आंबा हंगाम तोंडावर असताना हवाई वाहतूक पूर्ववत न झाल्यास निर्यातदारांचे आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सरकारने तातडीने पर्यायी बाजारपेठा शोधाव्यात
एकूणच, नाशिक-सांगलीच्या द्राक्ष उत्पादकांसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा होता — उत्पादन कमी, दर चांगले आणि रमजानची मागणी जास्त — पण इराण युद्धाने ही सुवर्णसंधी हिरावून घेतली आहे. सरकारने तातडीने पर्यायी बाजारपेठा आणि नुकसान भरपाईची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

Related Articles

Back to top button