जागतिक हवामानावर मोठा परिणाम करणाऱ्या ‘एल निनो’ या हवामान प्रणालीचे पुनरागमन होत असल्याचे संकेत चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (एनसीसी) दिले आहेत. २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रभाव अधिक तीव्र होणार असून, याचा थेट फटका शेती आणि जागतिक अन्नपुरवठ्याला बसण्याची शक्यता आहे.
चीनच्या हवामान शास्त्रज्ञांनुसार, ‘एल निनो’ची परिस्थिती मे २०२६ पासून निर्माण होण्यास सुरुवात होईल. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या काळात हा प्रभाव मध्यम ते तीव्र स्वरूपाचा राहण्याचा अंदाज आहे. चीनने विक्रमी उष्णतेचा इशारा दिला आहे. या नैसर्गिक बदलामुळे २०२६ किंवा २०२७ हे वर्ष आतापर्यंतचे जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. जागतिक तापमानात सुमारे ०.२ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

भात पिकावर मोठे संकट
एल निनोमुळे दक्षिण चीनमध्ये परतीच्या पावसाच्या काळात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यामुळे काढणीला आलेल्या ‘लेट-सीझन’ भात पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. याउलट, उत्तर चीन आणि मांचुरियन भागात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे धान्योत्पादनावर परिणाम होईल. येणारा हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उबदार राहण्याची शक्यता असल्याने, पुढील वर्षीच्या (२०२७) सुरुवातीला शेतीच्या कामांसाठी पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.
जागतिक परिणाम
चीन हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असल्याने, तेथील उत्पादनात घट झाल्यास जागतिक बाजारात तांदळाचे दर वाढण्याची आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘सुपर एल निनो’ची भीती?
काही आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्सनी याला ‘सुपर एल निनो’ किंवा ‘गॉडझिला एल निनो’ असेही संबोधले आहे. याचा परिणाम केवळ चीनवरच नाही, तर भारत, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही दुष्काळ किंवा विस्कळीत मान्सूनच्या स्वरूपात दिसू शकतो.
चीनच्या या अधिकृत इशाऱ्यामुळे जागतिक कमोडिटी मार्केट आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. हवामान बदलाच्या या संकटामुळे अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.















