शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा परिणामकारक ठरत आहे. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा हा नवा मंत्र चांगलाच परिणामकारक ठरत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकूळमुळे नुकसान सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही या प्रयोगाचा आदर्श घेऊन आपले शेतीचे नुकसान टाळता येऊ शकेल.
महाराष्ट्र राज्यातही वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीपासून शेतकऱ्यांची पिके वाचवणे, हे मोठे आव्हान बनले आहे. वन्य प्राणी विशेषत: माकडे, हरीण, डुकरे हे शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेल्या पिकांची शेवटच्या क्षणी नासधूस करतात, त्यामुळे त्यांच्यावर अन्नाच्या संकटाचा सामना करावा लागतो.
शुभ, पूजा कार्यातील हळद ठरतेय प्रभावी
उत्तराखंडमधील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांमुळे पिकाच्या नुकसानीपासून मुक्त होण्यासाठी एक मोठा उपक्रम सुरू केला आहे. हळदीची लागवड करून शेतकरी आपली पिके वाचवू शकतात, हे या उपक्रमातून दिसून आले आहे. भारतीय संस्कृतीत विविध शुभ आणि पूजा कार्यात हळदीला प्रथम स्थान देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर औषधातही हळदीला महत्त्व आहे.
हळद लागवडीचा वाढीव उत्पन्नालाही फायदा
वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतांमध्ये हळदीची लागवड प्रभावी ठरत आहे. अन्य राज्यातील शेतकरीही शेतात हळदीचे जोड उत्पादन घेऊ शकतात. अन्नधान्य पिकांच्या लागवडीमध्ये कमी जमीनधारणा आणि कमी उत्पादन मूल्य पाहता गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल तसाही हळद लागवडीकडे वाढत आहे. शेताच्या काही क्षेत्रात बाहेरील बांधावर हळद लावून आत हवे ते पीक लावूनही शेतकरी मार्ग शोधू शकतात.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
हे आहेत हळद लागवडीचे फायदे
उत्तराखंड राज्यात 2008 मध्ये हळद लागवडीचे उत्पादन 6,638 टन असताना, 2016 मध्ये त्याचे उत्पादन 8,804 टनांपेक्षा जास्त झाले. हळदीच्या फायदेशीर लागवडीचा अवलंब करून शेतकरी केवळ आपले उत्पादन वाढवू शकत नाहीत, तर बेरोजगारीही दूर करू शकतात. हळद लागवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत या पिकावर कीटक रोग प्रादुर्भाव आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव फारच कमी असतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हळद पिकाला पाऊस, सिंचनाची फारशी गरज पडत नाही.
हळदीचे औषधी उपयोग
ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जी.सी.जोशी यांच्या मते दैनंदिन वापरात उपयुक्त असण्यासोबतच हळदीचे औषधी महत्त्वही आहे. अपघाती दुखापत, कफ, वायू आणि पित्ताशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी देखील हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचे वनस्पति नाव Curcuma Longa आहे. उत्तराखंड राज्यातील डोंगराळ भागात 1,500 ते 1,800 मीटर उंचीवर या पिकाची लागवड सहज करता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या ठिकाणी इतर पिके घेता येत नाहीत, अशा सावलीच्या ठिकाणी सहजपणे हळद लागवड करता येते. हळदीचा वापर साबण आणि क्रीम बनवण्यासाठी देखील केला जातो.
कृषी खात्याकडून 50 टक्के अनुदानावर हळद रोपे
अल्मोड़ा जिल्हा फलोत्पादन अधिकारी भावना जोशी सांगतात की, हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते. उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये पंत पिताभ, सुगंधा, रोमा, सुवर्णा आणि हळदीच्या स्थानिक जाती पिकवल्या जातात. त्याची हिरवी पाने आणि कंदांपासूनही तेल काढले जाते. त्याचे मिश्रण साबण आणि क्रीम बनवण्यासाठी देखील वापरले जाते. हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिन या घटकामुळे तिला बाजारात मोठी मागणी आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- ऊस पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल
- कृषी सल्ला : केळी – थंडीचा लहान रोपांवर होणारा परिणाम