कापूस लागवडीमध्ये खान्देश आघाडीवर आहे. सर्वाधिक कापूस लागवडीमद्धे जळगाव राज्यात पुढे आहे. सध्या कापूस पिकात सघन लागवड पद्धत फायद्याची ठरत आहे. कापूस सघन लागवड पद्धती मध्ये कायिक वाढ व्यवस्थापण केल्यास उत्पन्नामध्ये भर पडल्याचे निदर्शनास येत आहे.
सघन कापसाची लागवड ही मध्यम खोल जमिनीत ९० x ३० सेमी या अंतरावर करावी किंवा उथळ जमिनीत ९० x १५ सेमी या अंतरावर करावी. ९० x ३० सेमी या अंतरावर लागवड केल्याने झाडांची एकरी संख्या १४८१४ इतकी व ९० x १५ सेमी या अंतरावर लागवड केल्याने झाडांची एकरी संख्या २९,६२९ इतकी राहते. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. एका जागेवर एकच बी लावावे. या सघन लागवड प्रणालीमध्ये जर कायिक वाढ व्यवस्थापन केले तर एकरी उत्पन्न वाढीमध्ये निश्चित भर पडते. कायिक वाढ व्यवस्थापनासाठी कपाशीचे पीक हे ३० ते ४५ दिवसाचे झाले की त्याची गळफांदी मुळ खोडपसून १ इंच लांब कटरच्या सहाय्याने काढून टाकावी. ह्या फांद्या एका झाडावर १ ते ४ असू शकतात. त्यांना अचूकपणे ओळखून त्यांची वाढ होण्याआधी काढून टाकाव्या. तसेच ८५ ते ९० दिवसानंतर किंवा कापूस कमरेएवढा झाल्यानंतर कपाशीचा मुख्य शेंडा खुडावा. म्हणजेच झाडाची ऊंची ३.५० ते ४.०० फुट झाली की शेंडा खुडावा.
गळफांदी कशी ओळखावी?
कापसाच्या झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. एक गळफांदी (मोनोपोडीया), दुसरी फळफांदी (सिम्पोडीया). या दोन्ही फांद्यांची लक्षणे भिन्न असतात.
गळफांदी : गळफांदी सुरुवातीलाच येते. एका झाडावर त्या तीन किंवा चार असतात. या फांद्या वाढीसाठी मुख्य झाडाला स्पर्धा करतात. झाडाला दिलेले ७० टक्के खत गळफांद्या घेतात. गळफांद्यांनंतर फळफांद्या येतात व त्या जमिनीला समांतर आडव्या वाढतात. या फांद्यांची जाडी वाढत नाही. खोडाकडून आलेला अन्नरस त्या बोंडाला देतात. जेवढा अन्नरस मिळेल तेवढ्या प्रमाणात फळफांद्यांवर बोंडे लागतात व त्यांचे पोषण होऊन बोंडे वजनदार येतात. त्याउलट गळफांदी जोमाने वाढते. मात्र बोंडांची संख्या कमी व वजनही कमी म्हणजे अर्धा ते दीड ग्रॅम भरते.
फळफांदी : ही फांदी खोडापासून निघून जमिनीवर समांतर आडवी वाढते. एका झाडावर या फांद्यांची संख्या झाडाच्या उंचीवर अवलंबून असते. १२ ते १५ फळफांद्या असतात. ही फांदी जास्त जागा व्यापते.
झाडचा शेंडा : ८५ ते ९० दिवसानंतर किंवा कापसाच्या झाडाची ऊंची ही ३- ४ फुट एवढी झाल्यावर मुख्य शेंडा खुडावा. यामुळे झाडाची ऊंची मर्यादेत राहून झाडाची शाकिय वाढ जास्त होते, बोंडे भरण्यास व तसेच बोंडातील कपसाचे वजन वाढण्यास मदत होते.
गळफांदी काढायचे फायदे
● गळफांदी काढल्यामुळे झाड जे अन्नद्रव्य घेते ते सर्व फळफांदीला जाते. यामुळे त्यांची जोमाने वाढ होते.
● जमिनीतील सर्व अन्नद्रव्ये, ओलावा हा फक्त फळ फांद्याना मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व वजन वाढण्यास मदत होते.
● गळफांदी काढल्यामुळे झाडामध्ये दाटी होत नाही परिणामी हवा खेळती राहते.
● उत्पादन खर्चात बचत होते.
● गळ फांद्या कापल्याने व झाड कमरेएवढेच ठेवल्याने झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो.
● झाडाला मोकळी हवा मिळते यामुळे बुरशी किंवा इतर रोगाची लागण होत नाही.
● फुले, पात्या, बोंडांना सूर्यप्रकाश मिळाल्याने त्यांची गळ होत नाही.
● झाडांची उंची कमी राहिल्याने कीडरोग प्रमाण कमी राहते व फवारणीचा खर्चही कमी होतो.
● लांब दांडीचे पाने व जास्तीच्या फांद्या कापल्याने रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, रोगाचा प्रादुर्भाव ई. कमी दिसतो तसेच ते वेळीच अटकाव करण्यास सोपे जाते.
● या कापसाचे उत्पादन नोव्हेंबरअखेरपर्यंत येऊन शेत रिकामे होते.
● शेतकर्याकडे सिंचनाची सोय असल्यास तो रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिके घेऊ शकतो.
● या तंत्राने ते एकरी १५ ते २१ क्विंटल सहज उत्पादन घेण्यात शेतकर्यांना यश मिळाले आहे.
गळफांदी कापताना घ्यावयाची काळजी
⮚ गळफांदी कापताना प्रथम फळफांदी व गळफांदी कोणती याची माहिती करून घ्यावी. गळफांदी ह्या एका झाडावर किमान ३ ते ४ असतात.
⮚ गळफांदी ही खोडच्या अगदी सुरुवातीला लागते व ती खोडाला समांतर वाढते. फळफांदी ही जमिनीला समांतर वाढते.
⮚ गळफांदी ही साधरणतः लागवडीनंतर ४० दिवसांनी ओळखायला येते. तेव्हा त्यावर पाने व शेंड्यावर काही पात्या लागल्या असतात.
⮚ ती अचूकपणे ओळखून खोडापासून १ इंच अंतरावर धारदार कटरच्या सहाय्याने कापावी.
⮚ गळफांदी कापायला खुप उशीर झाल्यास ती खोडा एवढी जाड होते व तोपर्यंत बरेच अन्न द्रव्य ती शोषून घेते. जाड झाल्यामुळे ती कापायला कठीण जाते. म्हणून ती वेळेवर कापावी.
⮚ गळफांदी कापत असताना खोडाची साल निघू नये किंवा झाडाला ईजा होऊ नये याची काळजी घ्यावी.
⮚ गळफांदी कापताना वातावरण कोरडे असायला हवे. (पाऊस किंवा ढगाळ वातावरण नको) अशा वातावरणात गळफांदी कापली तर तिथे बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते.
⮚ शेंडा खुडताना सुद्धा वातावरण कोरडे असायला पाहिजे.
⮚ शेंडा खुडताना झाडाची ऊंची ३ फुट आहे का ते बघावे व ६ इंच लांबीचा शेंडा कटर च्या सहाय्याने कापावा.
⮚ प्रत्येक फळफांदीच्या बुडाला एक लांब दांडीचे पान असते, हे पान आकाराने मोठे असते. ते सुद्धा काढून टाकावे. कारण या पानावर किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो.
⮚ हिरव्या फांद्या काही पात्या व पाने कापताना त्याच्या मोहात न पडता ते झाडात दाटी करतात हे लक्षात घ्या.
⮚ ज्या कटर ने फांदी कापणार ते स्वच्छ व निर्जंतुक असायला पाहिजे.
⮚ चुकून बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास बुरशी नाशकाची फवारणी करावी.
अमेरिकेतील मराठमोळी जोडप्याची भन्नाट शेती..
यासोबतच कायिक वाढ व्यवस्थापनासाठी अतिसघन कापूस लगवडीमध्ये मेपीक्वॉट कलोराईड या वाढनियंत्रकाची फवारणी केल्यास कायिक वाढ रोखण्यासाठी मदत होते. पेरणीनंतर ३५-४५ दिवसांनी गळ फांद्या कापणे व ७५-८० दिवसणी शेंडे खुडणे याला पर्यायी मार्ग म्हणून पेरणीनंतर ३५-४५ दिवसांनी गळफांद्या कापणे व ४०-४५ दिवसांनी मेपीक्वॉट कलोराईड या वाढनियंत्रकाची फवारणी करणे. यासाठी मेपीक्वॉट कलोराईड १ मिली प्रति लीटर पाण्यात घेऊन पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५-२० दिवसांनी १.२ मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन करावी. आणि तिसरी फवारणी गरजेनुसार जर पावसामुळे झाडांची अति वाढ होत असेल तर १.२ मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन करावी.
मयुरी देशमुख
कृषी विज्ञान केंद्र,
ममुराबाद. जळगाव.