यशोगाथा

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

वंदना कोर्टीकर, पुणे –
आजच्या शहरीकरणाच्या धावपळीत, सिमेंटच्या भिंतीत, माणूस निसर्गाशी दुरावतोय आणि त्याबरोबर निसर्गाच्या प्रत्येक छोट्या कार्याला विसरतोय. पण या विस्मृतीच्या काळोखात, एक तरुण असा उभा राहिला. ज्याने मधमाश्यांच्या फडफडणाऱ्या पंखांत आपले स्वप्न पाहिले. ज्याच्या मनात फक्त गोडवा नव्हता तर एक जबाबदारी होती. ही गोष्ट आहे अमित गोडसे यांची. मेकॅनिकल इंजिनियर ते ‘बी बास्केट’ चे जनक. विशेष म्हणजे, त्यांच्या कार्यातून शेकडो मधमाश्या वाचल्या आहेत आणि आदिवासी भागांतील मध गोळा करणाऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. पुणे, मुंबई, बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये विस्तारलेला हा प्रकल्प लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्येही कार्यान्वित होणार असून, दरवर्षी सुमारे 5 टन शुद्ध मध ते विक्री करतात तेही एकाही मधमाशीला न मारता.

 

 

अमित गोडसे, रायपूरमधील निसर्गप्रेमी मुलगा, नोकरी करत होता मुंबईत – एका सॉफ्टवेअर कंपनीत. पण काँक्रीटच्या जंगलात त्याचे मन रमले नाही. एक दिवस पुण्यात त्यांच्या सोसायटीत मधमाश्यांच्या पोळ्यावर पेस्ट कंट्रोल केल्याने मृत मधमाश्या पाहून त्यांचा अंतर्मन हलून गेला – आणि तिथूनच सुरू झाला त्यांच्या ‘मधमाशी संवर्धन’ प्रवासाचा नवा अध्याय. त्याच्या मनात अनेक प्रश्न गडद होऊ लागले – “हेच मध आपण बाटल्यांतून विकत घेतो ना? मग मध हवा, पण मधमाश्या नको का?” लोक फक्त परिणाम पाहतात, कारणाचा विचार करत नाहीत.

 

सेंद्रिय शेती पाहण्यासाठी मालेगावला
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून सुट्टीसारखा निवांत क्षण मिळवायला अमित आपल्या एका मित्रासोबत त्याच्या वडिलांची सेंद्रिय शेती पाहण्यासाठी मालेगावला गेले. शेतीबद्दल विचारायचे सोडून ते थेट मधमाश्यांच्या पेट्यांबद्दल विचारत बसले. “हे तुम्ही स्वतःच ठेवलेय का?”, “कुठल्या प्रकारच्या मधमाश्या आहेत?”, “या कशा काम करतात?” – असे असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात उमटत होते. ते मधुमक्षिकापालन करत होते, पण अमित यांच्या सखोल आणि वैविध्यपूर्ण प्रश्नांना त्यांच्या उत्तरांची मर्यादा जाणवू लागली. त्यांनी सांगितले – “राज्यस्तरीय मधुमक्षिकापालन केंद्र महाबळेश्वरला आहे… आणि केंद्रीय केंद्र पुणे येथे. त्या क्षणी अमित यांची ती उत्सुकता थेट गुगलवर घेऊन गेली. त्यांना कळले – मधमाश्यांच्या पालनावर एक पाच दिवसांचा प्राथमिक कोर्स असतो.

 

 

महाबळेश्वरला जाऊन केला अभ्यास
अमित यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यात नाव नोंदवले. कोर्सच्या त्या काही दिवसांतच नवी दृष्टी मिळाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वरला जाऊन एक महिन्याचा सखोल कोर्सही पूर्ण केला. या अभ्यासात अमित याना असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली. अखेर, एक दिवस कंपनीत जाऊन अमित यांनी सरळ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी थोडीफार बचत केली होती. त्यामुळे “बघू, पुढचं पुढे” असा विचार करत ते पूर्णपणे मधमाश्यांच्या दुनियेत झोकून देण्यास तयार झाले.

 

मधमाशी वाचवण्याचा सुरु झाला प्रवास
सुरुवातीला त्यांनी शाळा, कॉलेजेस, सोसायट्या, विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन मधमाश्यांवर व्याख्याने द्यायला सुरुवात केली. लोकांना समजावून सांगायचे, की मधमाश्या आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. कोणालाही त्यांच्या परिसरात मधमाश्यांचे पोळं आढळल्यास, त्यांनी आपल्याशी संपर्क करावा – असे ते सांगायचे. सुरुवातीला अमित हे सगळं मोफतच करायचे. हळूहळू त्याचे नाव घराघरांत पोहोचू लागले. पोळं काढताना ते मधमाश्यांना मारत नसे. त्यांना हळुवारपणे पेटीत गोळा करायच, दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवायचे – आणि मध मिळवायचे. वेळ, श्रम, साहित्य आणि व्यवस्थापन यासाठी अमित यांनी या सेवेसाठी काही नाममात्र शुल्क घ्यायला सुरुवात केली. मधाचा अर्धा हिस्सा ते पोळ आढळलेल्या सोसायटी किंवा बंगल्याच्या मालकांनाही द्यायला लागले.

 

 

‘बी बास्केट’ स्वयंसेवी संस्थेची स्थापन
अमित यांना लवकरच जाणवले, की हे काम एकट्याने पुरेसं होणार नाही. त्यांनी आपल्यासारखेच अजून अनेक मधुमक्षिकामित्र तयार करण्याचे ठरवले – आणि ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेऊ लागले. या सगळ्यातून ‘बी बास्केट’ नावाची वेबसाइटही उभी राहिली. ही केवळ एक माहिती देणारी साइट नव्हती – ती एक चळवळ होती. अमित यांनी ‘बी बास्केट’ नावाची एक स्वयंसेवी संस्था देखील स्थापन केली. त्यात प्रशिक्षण, पोळं काढण्याची सेवा, शुद्ध मधाची विक्री – हे सगळं सामावले होते.

 

दरवर्षी 5 टन मधाची विक्री
आता विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा राज्यांमधून देखील मध गोळा करून, विक्रीचे सशक्त नेटवर्क त्यांनी तयार केले आहे. आज ते दरवर्षी जवळपास पाच टन शुद्ध मध विकता आणि विशेष म्हणजे, एकही मधमाशी न मारता! आजच्या काळात ‘शुद्ध मध’ मिळणे हे एक मोठे आव्हान झाले आहे. बाजारात अनेक ठिकाणी गुळाचा पाक मध म्हणून विकला जातोय. ग्राहकांची फसवणूक होते आणि या सगळ्यावर कोणतंच ठोस नियंत्रण नाही. मधाच्या शुद्धतेसाठी सध्या भारतात कुठलाही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांना खरं तर खात्रीशीर, नैसर्गिक आणि रसायनमुक्त मध मिळणे अवघड झाले आहे. अशा वेळी अमित यांनी काम केवळ अभिनंदनीयच नाही, तर अत्यावश्यकही आहे. अमित यांनी सुरू केलेल्या ‘बी बास्केट’ प्रकल्पाचे आज पुणे, मुंबई, बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्येही कार्य विस्तारले आहे. लवकरच छत्रपती संभाजीनगर मध्येही त्यांचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. आता अमित एकटे नाही. त्यांच्यासोबत आणखी सहा जण पूर्णवेळ काम करत आहेत. काही जण प्रशासन सांभाळतात, काही मध संकलनाचे काम पाहतात, तर काही प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. प्रत्येक जण या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

संपर्क :-
अमित गोडसे
9920698778

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

Related Articles

Back to top button