गुजरातमध्ये एनपीके खताच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप

गुजरातमध्ये रब्बी हंगाम तोंडावर असतानाच एनपीके खताच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. इफकोने एनपीके खताच्या एका बॅगेमागे 500 रुपयांपर्यंत दरवाढ केल्याचे वृत्त आहे.
सुरेंद्रनगर, बनासकांठा, भावनगर, मेहसाणा, गीर सोमनाथ जिल्ह्यातील शेतकरी या दरवाढीमुळे अडचणीत आले आहेत. एका शेतकऱ्याने सांगितले की, पेरणीच्या वेळी एका बिघ्याला 20 किलो डीएपी लागते आणि आता प्रतिकिलो 24-25 रुपयांची वाढ झाल्याने कर्ज काढावे लागत आहे.
View this post on Instagram
मागील काही महिन्यांत खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे – डीएपी मध्ये 150 रुपये, एनपीके मध्ये 850 रुपये, अमोनियम सल्फेटमध्ये 300 रुपये आणि पोटॅशमध्ये 550 रुपयांची वाढ झाली आहे. भारत अजूनही एनपीके साठी 30-35% आणि पोटॅशसाठी जवळपास 100% आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम दरावर होत आहे.
सरकारचा दावा फोल
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांगितले की, जागतिक बाजारात युरियाची बॅग 3,000 रुपयांना असताना भारतीय शेतकऱ्यांना ती 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत दिली जात आहे. डीएपी ची आंतरराष्ट्रीय किंमत 5,000 रुपयांवर गेली असताना शेतकऱ्यांना ती 1,350 रुपयांत दिली जात आहे. सरकारने खत अनुदानासाठी 1.6 लाख कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.
मात्र, प्रत्यक्षात बाजारात खतांच्या टंचाई आणि चढ्या दरामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना रब्बी हंगामापूर्वी आर्थिक फटका बसत आहे.



