आमदार संजय गायकवाड यांच्या निलंबनाची शक्यता
शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील विधान भोवले; एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम' होणार असल्याची चर्चा

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या असंवेदनशील विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले असून त्यांनी गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिलाई मशीन, सायकल वाटप, धान्याचे ट्रक असे उपक्रम राबवत असताना आमदाराकडूनच असे वक्तव्य आल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्यांच्याविरोधातील कोणतेही विधान खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिला असून लवकरच अधिकृत निलंबनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कारवाईच्या धास्तीने घुमजाव
कारवाईची चर्चा सुरू होताच आमदार गायकवाड यांनी सारवासारव सुरू केली आहे.
“माझे वडील सुद्धा शेती करायचे, मी शेतकरी कुटुंबातील आहे, मी शेतकऱ्यांबद्दल वाईट बोलूच शकत नाही. माझं विधान व्यसनी होऊन संसार उघड्यावर टाकून आत्महत्या करणाऱ्यांबद्दल होतं. त्याचा विपर्यास झाला. तरीही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
निलंबनाच्या आदेशाबाबत विचारले असता त्यांनी “नो कमेंट्स” म्हणत प्रतिक्रिया टाळली आहे, तर दुसरीकडे पक्षाकडून अद्याप कोणतीही लेखी नोटीस आली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते गायकवाड?
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गायकवाड म्हणाले होते की,
“जो शेतकरी टोकाचे पाऊल उचलेल, आत्महत्या करेल, त्याच्या अंत्यसंस्काराला देखील कुणी जाऊ नये. त्याच्या मृतदेहाला जनावराला खाऊ द्यात, तेव्हाच त्यांना कळेल.”
तसेच शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतात, अडचण असेल तर आमदार-खासदारांना चिठ्ठी लिहावी, आम्ही मदत करू असेही ते म्हणाले होते.
या विधानामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनीही टीका केली.
View this post on Instagram




