विदर्भ-मराठवाड्यात राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात 'अर्णब' चक्रीवादळाची शक्यता

मुंबई : राज्यात दोन वेगवेगळ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत, त्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. यातून रविवार, 26 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पावसाचे चित्र पुन्हा बदलणार आहे. हवामान विभाग (आयएमडी)ने विदर्भ-मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे.
शनिवारी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात दुसरा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आयएमडीने शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागासाठी यलो अलर्ट दिला होता. सिंधुदुर्गात सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला, गोव्यातही पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरात संध्याकाळी मुसळधार पावसाने तडाखा दिला.
29 ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज
आयएमडी महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी स्पष्ट केले की, बंगालच्या उपसागरातील पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा शनिवारी डिप्रेशनमध्ये तर रविवारी डीप डिप्रेशनमध्ये आणि 26 ऑक्टोबर सकाळपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होईल. या चक्रीवादळाला बांगलादेशने दिलेले ‘अर्णब’ असे नाव आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकून 28 ऑक्टोबर पहाटे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर परिणाम
1. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र (25-26 ऑक्टोबर): अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकणातला शनिवारचा पाऊस रविवार (25 ऑक्टोबर) पासून हळूहळू कमी होईल. सोमवार 26 ऑक्टोबरपासून ठाणे, रायगड, मुंबईमध्ये हवामान कोरडे आणि ऑक्टोबर हीट वाढण्याची शक्यता आहे.
2. विदर्भ आणि मराठवाडा (27 ते 29 ऑक्टोबर): बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळ जेव्हा मध्य भारताकडे (छत्तीसगड, मध्य प्रदेश) सरकेल, तेव्हा त्याचे अवशेष म्हणून महाराष्ट्रात पाऊस येईल.
– 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यात लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये ढगाळ हवामानासह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
– यामुळे रब्बी पेरणीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, पण काढणीला आलेल्या सोयाबीन, कापसाला फटका बसू शकतो.
शेतकऱ्यांसाठी सूचना
27 तारखेपर्यंत शेतातील पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा. मच्छिमारांनी बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असा इशारा आयएमडीने दिला आहे.





