मुंबई : मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जून, जुलै आणि ऑगस्ट हे मान्सूनचे तीन महिने पूर्ण झाले असून सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल..? यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर 2024 – पावसाचा हवामान अंदाज वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असेल, तेही जाणून घ्या…
सुरुवातीला जून महिन्यात पावसाचा जोर फारच कमी होता पण, जुलै महिन्यात पावसाने कमबॅक केले आणि ऑगस्ट महिन्यातही पावसाने दमदार बॅटिंग केली. या तीन महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून काही धरण 100% भरले आहे. भारतात मान्सून 1 जूनला सुरू झाल्यापासून 31 ऑगस्टपर्यंत 701 मिमी पावसाची सरासरी असताना प्रत्यक्षात 749 मिमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये भारतात सरासरीपेक्षा 16% अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात असा राहील पाऊस
सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परत जातो. दरम्यान, महाराष्ट्रसह देशाच्या बहुतांश भागांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रसह गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज IMD कडून वर्तविण्यात आला आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तसेच लडाख, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून पंजाब आणि हरीयाणाच्या काही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे.
सप्टेंबर महिन्यात जिल्हानिहाय हवामान अंदाज
या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, धाराशिव, बुलढाणा, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता – लातूर, परभणी, बीड, सोलापूर आणि नगर: या भागांच्या काही भागांत नेहमीपेक्षा थोडा कमी पाऊस किंवा सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान
संपूर्ण देशात : सरासरीच्या 116%
कोकण : सरासरीच्या 97%
मध्य महाराष्ट्र : सरासरीपेक्षा 53% जास्त
मराठवाडा : सरासरीच्या 85%
विदर्भ : सरासरीच्या 77%
देशभरातील 1 जून ते 31 ऑगस्टचे पर्जन्यमान – सरासरीच्या 107%
राज्यातील एकूण पाऊस : सरासरीच्या 126%
कोकण : सरासरीपेक्षा 30% जास्त
मध्य महाराष्ट्र : सरासरीपेक्षा 51% जास्त
मराठवाडा : सरासरीपेक्षा 15% जास्त
विदर्भ : सरासरीपेक्षा 16% जास्त