आपण आयुष्यात अनेकदा सहजपणे म्हणतो की, काही लाज शरम आहे की नाही? पण आता ते म्हणण्याची वेळ अमूल या भारतातील सर्वात मोठ्या सहकारी उत्पादक कंपनीवर आली आहे. “शरम” या “अमूल”च्या चीजवरून हा गोंधळ उडाला. त्यावरून कंपनीने सोशल मीडियातील वाह्यात क्रिएटर्सचा चांगलाच क्लास घेतला. तोवर युझर्सच्या कल्पनाशक्तीला ऊत आला होता आणि सोशल मीडियावर बरेच चीज वाहून गेले होते!
तर त्याचे असे झाले की, कुणीतरी अमूलच्या नव्या “शरम” चीजच्या पॅकेटचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. ही एक एआय जनरेटेड इमेज होती. प्रत्यक्षात अमूलचे “शरम” या नावाने कोणतेही चीज अथवा अन्य उत्पादन नाही. कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा खुलासा केला. तोवर सोशल मीडियावर कोणतीही शरम न बाळगता अनेक युझर्सकडून कल्पनाशक्तीच्या अनेक चीजी स्लाईस रचल्या गेल्या होत्या.
शरम नाम की भी कोई चीज होती है!
याची सुरुवात झाली अंकित सावंत नावाच्या युझरने केलेल्या ट्विटने. त्याने शरम चीज च्या पॅकेटचे एआयद्वारा बनवलेले छायाचित्र पोस्ट केले. त्याला कॅप्शन होते – “शरम नाम की भी कोई चीज होती है!” 19 डिसेंबर रोजी शेअर केल्यापासून, या पोस्टने आधीच पाच लाखांहून अधिक व्ह्यू आणि 10 हजार लाईक्स ओलांडले आहेत. अनेक एक्स (ट्विटर) युझर्सना या पोस्टमधील कल्पना आवडली.
शरम चीज नसेल तर तो बेशरम पिझ्झा
या पोस्टला प्रतिसाद देताना एका युझरने लिहिले – “अमुल चीजशिवाय पिझ्झा – बेशरम पिझ्झा” म्हणजे, अमूल चीज वापरल्याशिवाय पिझ्झाला खरी चवच नाही, तो बेशरम पिझ्झा ठरेल. शरम चीज नसलेला पिझ्झा! दुसर्याने निदर्शनास आणून दिले की, “यापुढे दुकानातून काही शरम खरेदी करायला गेले, तर जरा वेगळेच वाटेल.”
पेटीएम संस्थापकालाही नव्या चीजचा मोह
पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शरम चीज पॅकेटची एआय इमेज आणि अमूल कंपनीच्या खुलाशासह ट्विट केले की, “शरम नाम की कोई चीज नहीं होती !” त्यावर अनेकांनी पेटीएम सारखेच आहे, तुम्हालाही काही शरम नाही, असे सुनावले.
अमूलने जारी केले स्पष्टीकरण
‘शरम चीज’ इमेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अमूलने स्पष्टीकरण जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, “अमूल चीजच्या नवीन प्रकाराबाबत Whatsapp आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बनावट संदेश फॉरवर्ड केला जात आहे. ही पॅक इमेज AI वापरून विकसित केले गेले आहे आणि ते अमूल ब्रँडचे नाव खराब करत आहे, हे संतापजनक आहे. या पोस्टमध्ये दर्शविलेले पॅक अमूल चीज नाही. या पोस्टमध्ये चुकीची माहिती दिली गेली आहे. ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती आणि चिंता पसरवणे हा त्यामागील उद्देश दिसतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया हा संदेश तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना अमूल चीजच्या चांगुलपणाबद्दल खात्री द्या. कोणतीही तक्रार असल्यास, कृपया आमच्या टोल-फ्री नंबर 1800 258 3333 वर कॉल करा.”
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- काय आहे कांदा बँक ; शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?
- गव्हाच्या ‘या’ वाणांची लागवड केल्यास मिळते बंपर उत्पादन!