हवामान अंदाज

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, १९ एप्रिलपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असून नाशिकसह सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि पुणे यांच्या माहितीनुसार १८ एप्रिलच्या रात्रीपासून हवामानात बदल सुरू होतील आणि १९ ते २१ एप्रिल दरम्यान पावसाचा जोर वाढेल. प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. काही ठिकाणी पावसासोबतच गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पावसाचे कारण काय?
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. तसेच वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे (सायक्लॉनिक सर्क्युलेशन) हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

शेतकऱ्यांना आवाहन
सध्या उन्हाळी पिकांची काढणी आणि फळबागांचे हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळणार असला, तरी विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पावसाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्यावर आसरा घेऊ नये, अशी सूचनाही आयएमडीने दिली आहे.

खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा (हीटवेव्ह) इशारा दिला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
दरम्यान, या वाढत्या उष्णतेचा पहिला बळी सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. शेतात काम करताना उष्माघाताने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी काम करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

Related Articles

Back to top button