इतर

आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन

आज ४ जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस आहे. ब्रेल लिपीचे जनक लुइस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त  दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ पासून ४ जानेवारी हा दिवस अधिकृतपणे ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.  अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो.
अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी. ह्या लिपीचा जनक ल्वी ब्रेल हा फ्रेंच अंधशिक्षक होय. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठावटिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते. अठराव्या शतकात व्हॅलेंटाइन हॉई ह्या फ्रेंच अंधशिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील, ही गोष्ट आढळून आली.

चार्ल्स बार्बिआ या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्याने उठावदार टिंबे आणि रेघा यांच्या आधारे रणांगणावरील रात्रीच्या संदेश वहनासाठी एक लेखन पद्धती तयार केली होती. ल्वी ब्रेल याला त्याने या पद्धतीच्या आधारे अंधांना वाचन करता येईल, अशी एक लिपी किंवा लेखनपद्धती (सोनोग्राफी) स्पष्ट करून सांगितली. तिचेच परिष्करण करून ब्रेलने अंधांसाठी स्वतंत्र लिपी तयार केली (१८२४). रॉबर्ट मून यांनी तयार केलेल्या लिपीत उठावदार ओळी वापरतात. नीलकंठराव छत्रपती यांनी देवनागरी लिपीवर आधारित ब्रेल पद्धत तयार करण्याचे कार्य केले

यूनेस्कोने १९४८ साली जागतिक ब्रेल संकेतांचा समन्वय केला. या संदर्भात भारताने पुढाकार घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. भारतातील १४ प्रमुख भाषांसाठी एक समन्वित ब्रेल पद्धती तयार करण्यात आली आहे. रोमन ब्रेल लिपीवरून भारतीय ब्रेल लिपी बनविण्याचे श्रेय अंधकल्याण संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते  एक संस्थापक अल्पाईवाला यांना देणे आवश्यक आहे. ही लिपी अंधकल्याण संघातर्फे मुंबई येथे प्रसिद्ध करण्यात आली. या लिपीत अक्षरलेखन, अंकलेखन यांबरोबरच गणित, विविध प्रकारची विज्ञाने यांतील वेगवेगळ्या प्रकारची चिन्हेही दर्शविता येतात. ब्रेल लेखनासाठी विशिष्ट प्रकारची पाटी, टोचा (स्टायलस) आणि कागद इ. साधने वापरली जातात. टंकलेखन यंत्रासारखी यंत्रेही ब्रेल-टंकलेखनासाठी उपलब्ध आहेत
संदर्भ – विकासपिडिया

 

Related Articles

Back to top button