इतर

पावनखिंड भाग – 9 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

बाजी ओरडले,
‘राजे, पुढं येऊ नका. माझ्या हाती अजून पट्टा आहे.’
‘बाजी, तो आम्ही पाहतो आहो! तुम्ही आम्हांला आज पाहत असाल. पण आम्ही तुम्हांला अनेक वर्षं ओळखतो. तुम्ही वीर आहात. जाणकार आहात. तुमच्यासारखी वडील माणसं आम्हांला हवी आहेत.’
‘कशासाठी?’
‘कशासाठी! आम्ही चुकलो, तर आम्हांला योग्य सल्ला देण्यासाठी. आपल्या भूमीचं रक्षण करण्यासाठी. इथल्या माणसांत इभ्रत मिळवण्यासाठी. आपले देव आणि देवळं सुरक्षित राखण्यासाठी. आपल्या आयाबहिणींची अब्रू रक्षण करण्यासाठी. नाही, बाजी, आम्ही परत सांगतो, आम्हांला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची. कृष्णाजी बांदल आम्हांला सामोपचारानं मिळाले असते, तर आम्हांला ते हवं होतं. पण त्यांनीच वैर पत्करलं.’


‘हे आम्ही खरं मानावं? बाजींनी सवाल केला.
‘बेशक!’ राजे म्हणाले. राजांचा हात गळ्यातल्या कवड्यांच्या माळेकडं गेला. तीवर हात ठेवत ते म्हणाले, ‘बाजी, आमच्यावर विश्वास ठेवा, जगदंबेची शपथ घेऊन आम्ही सांगतो. तुम्ही वयानं मोठे. आम्ही जे सांगितलं, त्यात कधी कसूर झाली, तर वडिलकीच्या आधारानं आमचा कान पकडा. द्याल, ती शिक्षा आम्ही आनंदानं मान्य करू.
राजे संथ पावलं टाकीत बाजींच्याकडं जात होते.
बाजींचं लक्ष राजांच्या निर्भय नजरेवर खिळलं होतं.
नकळत बाजींच्या हातचा पट्टा गळून पडला आणि ते राजांच्या मिठीत केव्हा बद्ध झाले, हेही त्यांना कळलं नाही.
मिठी सोडवून बाजी मागं झाले. दुशेल्यात खोवलेली तलवार त्यांनी म्यानासकट बाहेर काढली आणि राजांच्या पुढं आडवी धरली.
राजांनी ती तलवार हाती घेतली. बाजींच्या शेल्यात परत ठेवून दिली.
भावनाविवश झालेले राजे म्हणाले,
‘तुम्ही आम्हाला मिळालात; गड आल्यापेक्षा आनंद झाला. या प्रसंगाची आठवण म्हणून आम्ही तुम्हाला काय देऊ?’
‘आठवण!’
त्या शब्दाबरोबर बाजी वळले. माग थोड्याच अंतरावर कृष्णाजी बांदल पडले होते. त्यांच्या देहाशेजारी हतबल झालेले फुलाजी डोक्याला हात लावून बसले होते.
बाजी सावकाश वळले. क्षणभर त्यांच्या उग्र चेहऱ्यावर व्याकुळता पसरल्याचा भास झाला. ते म्हणाले,
‘राजे, काही का असेना, आम्ही बांदलांचे चाकर होतो. बांदलांचं वतन बांदलांकडं चालावं…’
‘ते का सांगायला हवं!’ राजे म्हणाले, ‘कृष्णाजी गेले. आमचं वैर मिटलं. बांदल आम्हाला मिळाले, तर त्यांचं वतन त्यांनाच राहील. आपलं वतनही आपल्याकडंच राहील. त्याला धक्का लागणार नाही. त्याची चिंता करू नका.’
बाजींच्यासह राजे कृष्णाजी जिथं पडले होते, तिथं गेले.
फुलाजींच्याकडं पाहत बाजी म्हणाले,
‘आमचे थोरले बंधू, फुलाजी.’


राजे फुलाजींच्या नजीक गेले. त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले,
‘उठा, फुलाजी! झालं गेलं, विसरून जा,’
फुलाजी उठले. त्यांच्या कमरेला काही शस्त्र नव्हतं.
राजांनी तलवार मागवली आणि फुलाजींच्या दुशेल्यात खोवली.
राजे कृष्णाजींच्या देहापाशी गेले. शांतपणे त्यांनी आपली तलवार, बिचवा तानाजीच्या हाती दिला. आपला दुशेला सोडला आणि तो हळुवार हातानं कृष्णाजींवर पांघरत म्हणाले,
‘कृष्णाजी गेले. आमचं वैर संपलं. बांदल मोठे शूर होते. राजे म्हणवून घेत होते. त्यांना त्याच सन्मानानं अग्नी द्या. त्यांच्या घरच्या मंडळींचं सांत्वन करा. त्यांना सांगा, कृष्णाजी गेले, तरी पोरकेपण वाटू देऊ नका. त्यांच्या जागी आम्ही आहो.’
राजे भानावर आले. ते बाजींकडं वळून म्हणाले,
‘बाजी, जे वीर रणांगणी पडले असतील, त्यांची विल्हे मानानं करा. ज्यांची घरटी जळली असतील, त्यांची घरटी परत आमच्या खर्चानं बांधून द्या.’
‘जशी आज्ञा!’
गडावर पहाट झाली होती. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात धुकं नाहीसं होत होतं. गडावर भगवा ध्वज फडकू लागला होता.

Related Articles

Back to top button