मुंबई : राज्यात 3 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तोवर कोकण, महाराष्ट्राच्या घाट भागात धुमशान चालू राहू शकेल. उत्तर महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणचा अपवाद वगळता पुढील काही दिवस फक्त गडगडाटच राहण्याची शक्यता आहे. उद्या, रविवारी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यातील परतीचा पाऊस अद्याप सुरु झालेला नाही. सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यात परतीचा मान्सून लांबण्याची शक्यता
सध्या देशाच्या काही राज्यातून मान्सूनचा पाऊस माघारी जायला सुरुवात झाली आहे. त्याचा महाराष्ट्रातील मुक्काम मात्र वाढण्याची शक्यता दिसत आहे. हवामान विभागाने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राज्यातील परतीच्या पावसाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे.
पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार बरसणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून येत्या 2-3 दिवसात कोकणात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्र वगळून मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर राहू शकेल. विशेषत: घाट क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत प्रामुख्याने पुण्यासह सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पश्चिमी वा-यांचा जोर वाढला
येत्या 24 तासात, 1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांत मध्यम तर, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस विदर्भात गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा, कोकणात सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो. राज्याच्या उर्वरित भागांत मात्र पावसाची उघडीप राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. प्रामुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहील. 3 ऑक्टोबरपासून मात्र पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या अरबी समुद्रात वा-यांचा वेग वाढला असून, तो 45 ते 55 कि. मी. वर गेल्याने पश्चिमी वा-यांचा जोर वाढला आहे.
जळगावात उकाडा जाणवण्याची शक्यता
जळगावमध्ये आज उकाडा जाणवू शकतो. इथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद व जालना येथेही कमाल 33 अंश तापमान राहू शकेल. धुळ्यात 32 अंशापर्यंत तापमान राहील. या सर्व भागात किमान तापमान 24 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
सध्याचा पाऊस का पडतोय?
अरबी समुद्रावर कर्नाटकच्या उत्तर किनारपट्टी भागासह दक्षिण कोकण आणि गोव्यानजीक नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या क्षेत्राच्या हालचालीतून म्यानमार आणि नजीकच्या बंगालच्या उपसागरावरही चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गोव्यासह कोंकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भ तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र-तेलंगणाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 
- कांद्याला येथील बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर ; पहा आजचे बाजारभाव
- दिवाळीपूर्वी मिळणार जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा