डाळिंबाच्या मृग बहार फळांची काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी विश्रांती अवस्थेतील मृग बहार बागेची मशागत व व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
• आधीच्या बहाराची फळे तोडणी झाल्यानंतर, शेणखत 20-25 किलो किंवा 13-15 किलो शेणखत + 2 किलो गांडूळखत + 2 किलो निंबोळी पेंड किंवा 7.5 किलो कोंबडी खत + 2 किलो निंबोळी पेंड प्रतिझाड द्यावे.
• रासायनिक खतामध्ये 205 ग्रॅम नत्र (446 ग्रॅम युरिया), 50 ग्रॅम स्फुरद (315 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट), 152 ग्रॅम पालाश (254 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) प्रतिझाड देऊन हलके पाणी द्यावे.
• रासायनिक खते दिल्याच्या तीन ते चार आठवड्यांनी, जैविक फॉर्म्युलेशन्स मिश्रण द्यावे. अझोस्पिरिलम स्पे किंवा ॲस्परजिलस नायजर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी 1 किलो आणि पेनिसिलिअम पिनोफायलम एकरी 3 किलो हे 2 ते 5 क्विंटल चांगल्या कुजलेल्या शेणखतात 1:25 या प्रमाणात मिसळून या मिश्रणाचे सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी बेड तयार करून, हलके पाणी शिंपडत त्यात 15 दिवस 60 ते 70 टक्के ओलावा ठेवावा. दर दोन दिवसांआड उलथापालथ करत राहावे. शेतात या मिश्रणाचा वापर करण्यापूर्वी त्यात अर्बास्कूलर मायकोरायझा बुरशी हे जैविक फॉर्म्युलेशन एकरी 1 किलो प्रमाणे मिसळावे. हे मिश्रण बागेमध्ये 300 झाडांना किंवा एक एकर क्षेत्रावर द्यावे.
डाळींब मृग बहार मशागत (बागेची अवस्था – विश्रांती)
• मृग बहारातील फळे तोडणी संपल्यावर लगेच पेन्सिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून 60 सें.मी.पर्यंत कापून खरड छाटणी करावी.
• तुटलेल्या, गुंतलेल्या आणि रोगग्रस्त फांद्या काढाव्यात. सरळ आणि झाडाच्या मधोमध वाढलेले पानसोट काढावेत, जेणेकरून सूर्यप्रकाश संपूर्ण झाडावर पडेल आणि हवा खेळती राहील.
• छाटणी केलेल्या झाडांवर त्याच दिवशी 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
• विश्रांती कालावधी किमान दोन ते तीन आठवड्यांचा असावा.
• हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार आठवड्यातून एक ते दोन दिवसांनी हलके पाणी (15 ते 20 लिटर प्रतिझाड) द्यावे. सिंचनाचे प्रमाण जमिनीत दिलेली पोषणद्रव्ये शोषून घेण्यासाठी पुरेसे असावे.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)