शेतकऱ्यांनी कापूस फरदड घेणे टाळायला हवे. अधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी कापूस वेचणीनंतर फरदड कापूस घेतात. त्यातून थोडे अधिक उत्पादन कदाचित मिळेलही; पण याच फरदड कापसामुळे शेतजमिनीचे नुकसान होते. शिवाय, बोंडअळीमुळे इतर पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. तात्पुरत्या स्वरुपासाठी फरदड कापूस चांगला असला तरी त्यामुळे नुकसानच होते हे शेतकरी बांधवांनी ध्यानात घ्यावे.
साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या 90 दिवसांपासून पुढे) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव दिसून येत नाही. परिणामी लांबलेल्या हंगामानुसार बोंडांवरील प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे कपाशी व बियांचे नुकसानही वाढत जाते.
आदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवला पाहिजे. त्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावे. अळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव व हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात. पीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढ्या चरावयास सोडाव्यात. पहाटीचे अवशेष जाळून टाकावेत.
कोणत्याही कारणास्तव वेचणीनंतर शेतात कपाशीचे पीक तसेच ठेवणे किंवा कपाशीच्या पिकाचे अवशेष साठवणे टाळावे. अशी तजवीज केल्यामुळे खाद्य पुरवठ्याअभावी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)