नाशिक – शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्या कुटुंबावर भयंकर संकट कोसळू शकते. काय आहे हा धोका? फवारणीत योग्य खबरदारी न घेतल्याने नेमके काय होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर आपण जाणून घेऊया.
आपल्याकडे पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना अनेकदा चक्कर येणे, मळमळ होणे, उकट्या होणे, अशा घटना घडताना दिसतात. हे नेहमीचेच, फवारणी करताना होतेच, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सततचा कीटकनाशकाचा संपर्क आणि हाताळणी, फवारणीत पुरेशी काळजी घेतली नाही, तर हा निष्काळजीपणा, ही बेपर्वाई फवारणी करणारा शेतकरी, शेतमजूर यांच्याबरोबरच त्या परिसरातील इतरांनाही धोकेदायक ठरू शकते.
ग्रामीण भागाला शहरी भागापेक्षा अधिक धोका – डॉ. सिद्धेश कलंत्री
नाशिकमधील नामको हॉस्पिटलमध्ये जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात कॅन्सर तज्ञ डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी या धोक्याबाबत इशारा दिला. ते म्हणाले की, ग्रामीण भागात कॅन्सरबाबत अनेकदा वेळेवर व योग्य निदान होत नाही, अनेक ठिकाणी चांगल्या पॅथॉलॉजी लॅब नसतात. इतर कॅन्सरची कारणे माहिती असू शकतात. मात्र, अनेकदा ब्लड कॅन्सरचे कारणच सापडत नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्लड कॅन्सरचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण भागात पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी केली जाते, शेतीसाठी केमिकल हाताळणी केली जाते. अनेकदा माहितीअभावी योग्य काळजी, खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोणतीही फवारणी करताना किंवा केमिकल हाताळताना काळजी घ्यावी. हात स्वच्छ धुवावेत, आणि मास्क वापरावा.
ब्लड कॅन्सर बरा होत नाही हा मोठा गैरसमज
रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) बरा होत नाही, हा आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे, असे प्रतिपादन नामको हॉस्पिटलमधील कॅन्सर तज्ञ डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी केले. जागतिक कर्करोग दिनाच्या (Cancer Day) पार्श्वभूमीवर, नामको हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “चला, सारे मिळून कर्करोगाला हरवूया,” असा सामूहिक निर्धार यावेळी कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांच्या साथीने केला गेला.
नाशिक मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक चॅरिटेबल ट्रस्टच्या पेठ रोड येथील नामको हॉस्पिटलमधील कर्करोग विभागात (Onco Ward) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर डॉ. सिद्धेश कलंत्री, कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. अश्विनी नागरगोजे, नामको चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. लक्ष्मीकांत पाठक, हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर समीर तुळजापूरकर, सुपरिटेंडंट विशाखा जहागीरदार, सायकॉलॉजिस्ट श्रेया गोलेच्छा, परिचारिका अधीक्षक समीक्षा काशीद उपस्थित होते.
डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी सहज-सोप्या भाषेत ब्लड कॅन्सरची माहिती देताना अनेक गैरसमज दूर करून नवी माहिती दिली. डॉ. कलंत्री म्हणाले की, सर्वच जण विचारतात, की ब्लड कॅन्सर झाला म्हणजे पेशंट गेला का? तर तसे आजिबात नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ब्लड कॅन्सरमधून वाचण्याचा दर 70-80 टक्के आहे. योग्य वेळी निदान, उपचार आणि आवश्यक खबरदारी रुग्णांनी घेतली तर इतर कॅन्सरपेक्षा ब्लड कॅन्सर मधून वाचण्याचे सरासरी प्रमाण व संधी जास्त आहे.
ब्लड कॅन्सरचे एकूण 650 प्रकार
सर्व ब्लड कॅन्सर हे सारखे असतात का? असाही प्रश्न केला जातो. एकूण 650 प्रकारचे ब्लड कॅन्सर आहेत, प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी आहे. त्यातले 70 ते 80 टक्के रुग्ण बरे होतात.
रक्तात 3 मुख्य घटक असतात. –
1. पांढऱ्या पेशी
2. लाल रक्तपेशी (हिमोग्लोबीन)
3. प्लेटलेट्स
रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते. पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो, त्या पेशी आजाराशी लढतात, तर प्लेटलेट्समुळे रक्ताची गुठळी (क्लॉट) होण्यास मदत होते. त्यामुळे जखम झाल्यास वाया जाणारे रक्त स्त्राव थांबतात.
सतत कुणाला आजारपण येत असेल तर हिमोग्लोबीन वाढत असेल. म्हणून लगेच हिमॅटॉलॉजिस्टला भेटावे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्लड कॅन्सरचे प्रमाण जास्त
कॅन्सरबाबत अनेकदा वेळेवर व योग्य निदान होत नाही, अनेक ठिकाणी चांगल्या पॅथॉलॉजी लॅब नसतात.
इतर कॅन्सरची कारणे माहिती असू शकतात. मात्र, अनेकदा ब्लड कॅन्सरचे कारणच सापडत नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्लड कॅन्सरचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण भागात पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी केली जाते, शेतीसाठी केमिकल हाताळणी केली जाते. अनेकदा माहितीअभावी योग्य काळजी, खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोणतीही फवारणी करताना किंवा केमिकल हाताळताना काळजी घ्यावी. हात स्वच्छ धुवावेत, आणि मास्क वापरावा.
ब्लड कॅन्सर अनुवांशिक नाही, संसर्गजन्य नाही.
ब्लड कॅन्सर अनुवांशिक नाही, संसर्गजन्यही नाही, असे सांगून डॉ. कलंत्री म्हणाले की, आता फक्त पुण्या-मुंबईतच नाही, तर नाशिकमध्येही अतिशय चांगले उपचार होतात, असे डॉ. कलंत्री म्हणाले. आधी धर्मादाय रुग्णालय असलेल्या नामको हॉस्पिटलने उत्तम नावलौकिक प्राप्त केला आहे. इथे अतिशय आधुनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधा उपलब्ध आहे. इथे ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स आहेत. येथील डॉक्टर, नर्सेस, सगळा स्टाफ चांगल आहे, उत्तम सुविधा आहे. मी परदेशात होतो, तेव्हा भारतात वैद्यकीय सेवेच्या कसे चित्र असेल, अशी आधी आशंका येत होती. मात्र, इथे आल्यावर मी पूर्णतः समाधानी आहे.
रुग्णांनी चाचण्यांना टाळाटाळ करायला नको
नामको हॉस्पिटलमध्ये काही रूम अशा आहेत की, तिथे बाहेरील हवा आत येऊ शकतं नाही, रुममधील हवा फिल्टर होऊन बाहेर येतो. इतक्या चांगल्या सुविधा येथे अतिशय वाजवी दरात उपलब्ध असून गरीब रुग्णांवर सरकारी योजनेतून मंजुरीनंतर मोफत उपचार केले जातात. मुलांसाठीही येथे कॅन्सर उपचाराचा स्पेशल वार्ड आहे, इथल्या सुविधांचा, उपचारांचा त्याचा लाभ घ्या.
काही पेशंटस चाचण्यांना टाळाटाळ करतात. मात्र, आपली प्रकृतीतील सुधारणा नेमकी कळायची असेल, तर चाचण्या आवश्यक असल्याचेही डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी सांगितले.
तुकडा काढला की कॅन्सर पसरतो अशी नाहक भीती
डॉ. अमोघ काळे – भारतात कॅन्सरचे प्रमाण जगामध्ये सर्वाधिक आहे. त्यात पुरुषात तोंडाचा कॅन्सर तर स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त असते.
मुख्यत: दोन कारणांनी तोंडाचा कॅन्सर होतो –
1. विडी, तंबाखू, जर्दा, गुटखा अशा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन
2. दारू (अल्कोहोल) सेवन
तोंडाच्या कॅन्सरमध्ये तोंडात लाल जखमा येतात, पांढरा किंवा काळसर चट्टा निर्माण होतो आणि तो महिनाभराहून अधिक काळ दिसतो. याशिवाय, मानेला अनेक गाठी होतात. जर 2 सेंटिमीटर किंवा त्याहून अधिक अशी गाठ हाताला कडक लागत असेल तर लगेच तपासणी करा.
घशाचा कॅन्सरमध्ये आवाज घोगरा होतो, त्यात दुर्बीण टाकून त्याची तीव्रता कळू शकते.
कुठल्याही कॅन्सरच्या निदानासाठी तुकडा काढावा लागतो, ज्याला वैद्यकीय भाषेत बायोप्सी म्हणतात. बायोप्सी केल्याशिवाय कोणत्याही कॅन्सरचे निदान होत नाही. मात्र, तुकडा काढला की कॅन्सर पसरतो, अशी भीती, अंधश्रद्धा आहे. ऐकीव माहितीतून तो गैरसमज आहे. ही भीती मनातून काढून टाका. तुकडा काढल्याशिवाय कॅन्सर निदान होत नाही आणि उपचार सुरू करता येत नाही.
कॅन्सरवरील निदानासाठी दुसरे म्हणजे CT Scan करावे लागते, म्हणजे कुठे, किती प्रमाणात तो पसरला आहे, हे या तपासणीतून कळते.
कॅन्सर ऑपरेशन केल्याने आता चेहरा विद्रूप होत नाही
तोंडाचा कॅन्सर असेल तर ऑपरेशन करून गाठी काढाव्या लागतात. त्यानंतर प्लास्टिक सर्जरी करून इतर अवयवाच्या ठिकाणचा भाग कापलेल्या जागी टाकावे लागतात, त्यामुळे मग चेहरा विद्रूप होत नाही.
ऑपरेशनशिवाय तोंडाच्या कॅन्सरवर रेडिएशन आणि केमोथेरपी हेही उपचार असतात.
याबाबत, तपासणीसाठी तुकडा काढला की कॅन्सर पसरतो आणि चेहरा विद्रूप होतो, या दोन मोठ्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत. तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूचे सेवन तातडीने थांबवावे, हाच महत्त्वाचा सल्ला आहे.
स्तनाच्या कॅन्सरमध्ये विद्रूपीकरण होऊ नये, ही काळजी
स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरमध्ये त्वचा लालसर होते, शिवाय स्तनात गाठी होतात. चाळीशीनंतर हा कॅन्सर साधारण होतो. त्यामुळे स्तनात गाठ लागली की लगेच तपासून घेणे, चांगले राहाते. सध्या स्तनाच्या कॅन्सरमध्ये अवयव काढल्यावर विद्रूपीकरण होऊ नये, ही काळजी घेतली जाते, कारण तो अवयव स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. गाठ कमी प्रमाणात असल्यावर आधी रेडिएशनने गाठ कमी करून मग ऑपरेशन केले जाते, अशी माहितीही डॉ. अमोघ काळे यांनी दिली.
कॅन्सर म्हणजे दुर्धर आजार हा आजही गैरसमज
डॉ. अश्विनी नागरगोजे – कॅन्सर म्हणजे दुर्धर आजार हा आजही गैरसमज आहे. शहरात तरी त्याबाबत जागरूकता आहे. मात्र, खेड्यात आजही त्याची भीती आहे, ऐकीव माहितीचा पगडा लोकांवर आहे. अनेकदा इतर पर्यायी उपाय लोकं करत बसतात आणि त्या काळात कॅन्सर पुढच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो.
रेडिएशनने खूप त्रास होतो हा चुकीचा समज
आम्ही नामको हॉस्पिटलमध्ये रेडिएशन आणि गरज पडली तरच केमोथेरपीने उपचार देतो. काही कॅन्सरसाठी 20 रेडिएशन, घशासाठी 35 रेडिएशन लागतात. स्तनासाठी 3 आठवडे आणि 5 आठवडे उपचार करावे लागतात. काही वेळा ऑपरेशन आणि केमोथेरपी पुरेशी ठरते, रेडिएशनची गरज नसते. रेडिएशनने खूप त्रास होतो हा आपल्याकडे एक चुकीचा समज आहे. तर, रेडिएशन का घ्यावे? हे समजून घ्यायला हवे. ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी शरीरातील कॅन्सरची गाठ (ट्यूमर) काढून टाकलेला असते. मात्र, कॅन्सर शरीरातून पूर्णतः हद्दपार होण्यासाठी ऑपरेशननंतर रेडिएशन आणि आवश्यकतेनुसार केमोथेरपी उपचार गरजेचे, महत्त्वाचे असतात. त्याबाबत ऑपरेशन करणाऱ्या, कॅन्सर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ऐकावा. पेशंटसनी रेडिएशन उपचाराची प्रोसेस पूर्ण करावी, ती अर्धवट टाकू नये. त्यामुळे भविष्यात नुकसान होण्याचा धोका असतो. जेव्हा पेशंट ऑलोपॅथी उपचारांच्या कक्षेपलीकडे असेल तर डॉकटर तसे सांगतील. त्यानंतरच इतर पर्यायी उपचार करायला हवेत. आपले आयुष्य वाढावे म्हणून ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.
रुग्ण, रुग्णांचे कुटुंब, डॉक्टर, नर्सिंग स्टाफचे योगदान महत्त्वाचे
.
डॉ. लक्ष्मीकांत पाठक – कॅन्सर उपचारात रुग्णांचे कुटुंब, डॉक्टर, नर्सिंग स्टाफचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्या पेशंटसना कुटुंबाचा आधार असतो, ते पेशंटस लवकर बरे होतात. त्यामुळे कॅन्सर पेशंटबरोबरच कॅन्सर पेशंटना पाठींबा देणाऱ्या, त्यांचे मनोबल उंचावणाऱ्या नातेवाईकांचे मुख्यतः आभार मानायला हवेत.
नामको हॉस्पिटल 2016 मध्ये कसे होते आणि आज कसे चित्र बदलले आहे, ते दिसतेय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चांगले हॉस्पिटल, असा आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. त्यासाठी मेहनत घेणारे सर्व तज्ञ डॉक्टरांधे आभार, त्यांच्यामुळेच हा लौकिक प्राप्त झाला. येथून आता दरवर्षी हजारो पेशंट बरे होऊन बाहेर पडत आहेत.
याशिवाय, नर्सिंग स्टाफ अभिनंदनास पात्र आहेत. या सिस्टर्स सातत्याने पेशंटबरोबर असतात, त्यांच्यामुळेच योग्य व वेळेवर उपचार होतात. त्या उत्तम सेवा देतात.
रुग्णांचे कुटुंब, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ या तिन्ही घटकांचे आभार मानायलाच हवेत.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे स्वस्तात उत्तम उपचार
नामको हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबरोबरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट, अँजिओप्लास्टी, बायपास वैगेरे हृदयरोगाचेही उपचार स्वस्तात उपलब्ध आहेत. आपल्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे 8 महिन्यात 8 यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यांची बाहेरची किंमत 2-3 कोटी रुपये होईल; पण आज त्यांचे नामकोमध्ये अवघ्या 1 कोटी रुपयात काम झाले. डॉ. सिद्धेश कलंत्री यांच्यामुळे ते शक्य होऊ शकले. कॅन्सरवर मात केलेल्या व कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सर्व रुग्णांना जागतिक कॅन्सर दिनानिमित्त शुभेच्छा. त्यांचे आयुष्य अधिकाधिक निरोगी व्हावे, वृद्धिंगत व्हावे!
यावेळी अनेक कॅन्सर पेशंटस् नीही आपले अनुभव कथन केले. सायकॉलॉजिस्ट श्रेया गोलेच्छा यांनी मेडिकल सोशल वर्कर्सच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ पाठक यांनी समारोपात, नेटक्या आयोजनाबाबतही आभार मानले.