केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडी कोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात कोळसा निर्मितीची भट्टी, कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि त्याच्या व्यवस्थित ज्वलनासाठी चूल तयार केली आहे.
कोळसा तयार करण्याची भट्टी ही लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. यात पहाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्सिजन आहे, तोपर्यंत पन्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा.
असा बनवला जातो कांडीकोळसा
कांडीकोळसा तयार करण्याचे यंत्र भट्टीत तयार झालेल्या कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात. हे यंत्र स्क्रू प्रेस तंत्रज्ञानावर चालते. कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्कूच्या साह्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते. यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो.
चूल
तयार झालेला कांडीकोळसा साध्या पारंपरिक चुलीमध्येही जाळता येतो. मात्र इंधनाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे. या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून, त्या जाळ्यांमध्ये हा कोळसा भरतात. या चुलीखाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो. कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते. चार माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी 400 ते 500 ग्रॅम कोळसा लागतो.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇