सातारा : शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. शेती क्षेत्रात तरुण शेतकर्यांची संख्या आणि नवनवीन प्रयोग करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होतांना दिसून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील वाठार निंबाळकर या गावातील दोघा भावांनी देखील शेतीत यशस्वी प्रयोग करुन इतर शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी 8 एकर क्षेत्रात सेंद्रिय डाळींबाची लागवड केली असून त्यातून त्यांनी 10-20 नव्हे तर तब्बल 80 लाखांची कमाई केली आहे. ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी आठ एकर शेतीचे क्षेत्र तब्बल 42 एकरावर नेले आहे. त्यांनी केलेली शेती सातारा जिल्ह्यासह परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कधी दुष्काळ तर कधी गारपीट, अशा अनेक अस्मानी संकटांचा नेहमीच सामना करावा करावा लागतो. एखाद्या वर्षी हंगाम चांगला झालाच तर शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकर्यांचे नुकसान होवून ते निराश होत असतात. मात्र, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावातील रहिवासी अमोल अहिरेकर आणि चंद्रकांत अहिरेकर यांनी अशा परिस्थितीतही करणार तर शेतीच… असा चंग बांधत शेतीतच राबण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वी देखील झाले असून सातारा जिल्हा आणि परीसरात त्यांच्याच शेतीची चर्चा होत आहे.
खत लिंकिंगचे गौडबंगाल माजी कृषी मंत्र्यांकडूनच अधिवेशनात उघड
फक्त दीड एकर शेतीने सुरुवात…
अहिरेकर यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती होती. त्या दीड एकर क्षेत्रापासून त्यांनी आपल्या शेतीला सुरुवात केली व सेंद्रिय पद्धतीने डाळींब लागवड करण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये त्यांनी या दीड एकर जमिनीवर पहिल्यांदा डाळींब पिकाची लागवड केली. अहिरेकर कुटुंबाने या दीड एकर क्षेत्रावर घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना पहिल्या वर्षीच चांगला नफा मिळाला. या पैशातून त्यांनी जवळच आणखी 4 एकर जमीन खरेदी केली. त्या 4 एकरात देखील डाळिंबाची लागवड केली, त्यातही त्यांना मोठा फायदा झाला. जस जसा नफा होत गेला तस-तसे अहिरेकर कुटुंबाने शेत जमीन विकत घेवून आपल्या शेती क्षेत्रात मोठी वाढ केली आहे.
सेंद्रिय खतांचा वापर
चंद्रकांत आणि अमोल अहिरेकर हे गेल्या 26 वर्षांपासून डाळिंबाची शेती करत आहेत. याविषयी बोलतांना ते सांगतात की, कोणतीही शेती करतांना त्याचा अभ्यास आणि नियोजन महत्वाचे असते. डाळिंबाच्या झाडांची योग्य वेळी छाटणी केल्यास तसेच रसायनांचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. फळधारणेच्या वेळी डाळिंबाच्या झाडांना शेणखत दिले जाते. वातावरणातील बदलाचा डाळिंबाच्या झाडांवर मोठा परिणाम होतो, त्यामुळे योग्य वेळी औषध फवारणीही केली जाणे देखील गरजेचे आहे. डाळिंबाच्या पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त असते. उन्हाळ्यातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळ्यातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात. या हवामानात काही अंशी बदल झाला तरी सुध्दा डाळिंबाचे उत्पादन चांगले येते. फुले लागल्यापासून फळे येई पर्यंतच्या काळात भरपूर ऊन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गोड फळे तयार होतात. परंतु, अशावेळी हवामानात मोठा बदल झाला तर पिकांना कीड लागण्याची शक्यता असते.
निर्मल रायझामिका 👇
अनेकांना रोजगार
अहिरेकर कुटुंब करीत असलेल्या शेतीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आज त्यांच्याकडे 25 ते 30 महिला काम करतात. किडींचा प्रादुर्भावाविषयी बोलतांना अहिरेकर सांगतात की, किडीच्या हल्ल्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व शेतातील सर्व कामांसाठी महिलांची मोठी मदत होत असते.
अन् शरद पवारांनी दिला सल्ला
गेल्या काही वर्षांपासून डाळिंबाचे चांगले उत्पादन होत असल्याने अहिरेकर कुटुंबीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांना दरवर्षी न चुकता डाळींब देण्यासाठी जातात. यंदा शरद पवार यांनी त्यांना त्यांच्या शेतातील डाळींब इराणला निर्यात करण्याचा सल्ला दिला असल्याचेही ते सांगतात.
असे आहेत डाळिंबाचे फायदे
डाळिंबाच्या रसात 10 ते 16 टक्के साखरेचे प्रमाण असते. ही साखर पचनास हलकी असते. कुष्ठरोगावर डाळिंबाचा रस गुणकारी असतो. त्याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी असते. कापड रंगविण्यासाठी सुध्दा फळांच्या सालीचा उपयोग केला जातो. अवर्षण प्रवण भागामध्ये हलक्या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड असल्याचे ते सांगतात.
नफ्यातून खरेदी केली शेती…
अहिरेकर कुटूंबाने दीड एकर क्षेत्रापासून सुरु केलेली शेती आता तब्बल 42 एकरावर पोहोचली आहे. 42 एकरपैकी 20 एकरांवर त्यांनी डाळिंबाची बाग लावली आहे. तर 22 एकरात उसाची लागवड केली आहे. 20 एकरांपैकी 8 एकर बागेत फळे तयार आहेत. या 8 एकरमध्ये 2200 झाडांवर 300 ग्रॅम ते 700 ग्रॅमपर्यंतची डाळिंबाची फळे लागली आहेत. एकरी 8 ते 10 टन डाळिंबाचे उत्पादन मिळण्याची शक्यता चंद्रकांत अहिरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार त्यांना 8 एकरात 80 टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. व्यापाऱ्यांकडून या डाळिंबाला 129 रुपये प्रतिकिलो भाव दिला आहे. तसेच ही फळे नेपाळ आणि बांगलादेशला निर्यात केली जाणार आहेत.