महिला शेतकऱ्याची कमाल; एक एकर संत्रा बागेतून 7 लाखांची कमाई

अमरावती : अमरावती जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा ‘कॅलिफोर्निया’. संत्रा उत्पादनासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात एका महिला शेतकऱ्याने आपल्या कष्टाने आणि योग्य नियोजनाने नवा आदर्श निर्माण केला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील भारती अरुणराव पोहोरकर यांनी अवघ्या एक एकर संत्रा बागेतून तब्बल 7 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून शेतीतील महिलांच्या कर्तृत्वाची आणि आधुनिक शेतीच्या यशाची मोहोर उमटवली आहे.

भारती या अवघ्या 7 महिन्यांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना “नकोशी” म्हणून सोडून दिले. त्यानंतर त्यांची आई सुमित्रा (सध्या वय 68) यांनी त्यांना करजगाव (ता. चांदूरबाजार) येथे त्यांच्या आजोळी आणले. आजी शांताबाई आणि आजोबा किसनराव भोगे यांनी दिलेल्या अवघ्या 1 एकर 4 गुंठे जमिनीवर हा सगळा संघर्ष उभा राहिला.
शिक्षण आणि नोकरी
शेतीत उतरण्यापूर्वी भारती यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून ‘एम.कॉम.’ पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांची तयारी केली, त्यात यश न आल्याने काही काळ चक्क पेट्रोल पंपावरही काम केले. पण शेवटी त्यांनी स्वतःच्याच शेतीत काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
View this post on Instagram
संत्रा शेतीतील तंत्र आणि प्रयोग
• सुरुवातीची तयारी आणि आंतरपीक: त्यांनी थेट संत्रा लावला नाही. पहिल्या 4 वर्षांत त्यांनी जमिनीत सेंद्रिय आणि बायो-फर्टिलायझर्स वापरून जमिनीचा पोत सुधारला. यादरम्यान त्यांनी कांदा आणि मिरची यांचे आंतरपीक घेऊन सुरुवातीचे उत्पन्न मिळवले.
• झाडांची निवड आणि लागवड: कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ‘रंगपुरी नागपूर संत्रा’ जातीच्या 180 कलमांची लागवड केली. (त्यातील 140 झाडे फळधारणेच्या मुख्य टप्प्यात).

• श्रम आणि पाणी व्यवस्थापन: मजुरांची मोठी टंचाई असल्याने खुरपणी, फवारणी, खते देणे आणि पाणी देणे ही सर्व कामे भारती स्वतः आणि त्यांच्या आई मिळून करतात. केवळ झाडांना बांबूचा आधार देण्यासाठी त्या मजुरांची मदत घेतात. त्यांनी ‘बेसिन इरिगेशन’ तंत्राचा वापर करून झाडांच्या मुळांना थेट पाणी देण्याचे नियोजन केले.
• विक्रमी उत्पन्न: चांदूरबाजार तालुक्यात 17,000 हेक्टरवर संत्रा आहे, पण वातावरणातील बदलांमुळे अनेक बागांचे नुकसान झाले. असे असूनही, भारती यांनी योग्य पोषण आणि कीड नियंत्रणाच्या जोरावर यंदाच्या हंगामात 140 झाडांवरून 7 लाख रुपयांचे प्रत्यक्ष उत्पन्न मिळवले.




