शेतकऱ्याला मातेमोल दाम; कांद्यात व्यापारी दलाल मालामाल

मुंबई – सध्या देशभरातील अनेक शहरी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जवळपास ८० टक्क्यांनी भडकले आहेत. मात्र, या दरवाढीचा फायदा घाम गाळून कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला अजिबात होत नसून, तो केवळ साठेबाज व्यापारी आणि दलालांचे खिसे भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देशात कांद्याचे उत्पादन घटलेले नसतानाही बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची लूट आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.
असे चालते साठेबाजीचे ‘इकोनॉमिक्स’
कांद्यामागील हे अर्थकारण संपूर्णपणे मध्यस्थ आणि बड्या घाऊक व्यापाऱ्यांच्या नियंत्रणात आहे. प्रत्यक्षात उत्पादनात कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही. मात्र, हवामानाच्या लहरीपणामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे नुकसान झाल्याचा बागुलबुवा उभा केला जातो. बड्या व्यापाऱ्यांकडून बाजारात जाणीवपूर्वक आवक कमी दाखवली जाते आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यानंतर वाहतूक व साठवणूक खर्चाचे कारण पुढे करून भाव वाढवले जातात. या संपूर्ण साखळीत रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात मातीमोल दामच पडतो, तर साठेबाजी करणारे दलाल आणि व्यापारी मात्र गब्बर होत आहेत.
सणासुदीत दर आणखी भडकण्याची चिन्हे
सर्वसामान्यांच्या ताटातील कांदा अचानक महागल्याने ग्राहकांच्या खिशाला थेट झळ बसत आहे. नवीन खरीप हंगामातील लाल कांद्याची मोठी आवक बाजारात पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत सध्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यातच जर परतीच्या पावसामुळे नवीन पिकाचे नुकसान झाले किंवा बाजारातील आवक लांबली, तर आगामी सणासुदीच्या काळात कांद्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे किमान पुढील काही आठवडे तरी ग्राहकांना कांद्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
तातडीने सरकारी हस्तक्षेपाची गरज
या नफेखोर व्यापाऱ्यांवर वेळीच चाप न लावल्यास सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी अशीच सुरू राहील. सरकारने आता बघ्याची भूमिका न घेता तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शासनाने स्वतःच्या ‘बफर स्टॉक’ मधील कांदा सवलतीच्या दरात तातडीने बाजारात आणावा आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जोपर्यंत या पुरवठा साखळीतील दलालांची मक्तेदारी मोडून पारदर्शक व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकरी आणि ग्राहक असेच भरडले जाणार आहेत.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल




