मुंबई – जून महिन्याचा पंधरवडा कोरडा गेल्यानंतर राज्यात आता मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. बहुतांश भागात मंगळवारी मान्सून दाखल झाला असून मागील चोवीस तासात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर पावसाच्या आगमनाने शेतकरीही सुखावला आहे.
राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले असून काही भागात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. उर्वरित राज्यातही पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह तब्बल सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सोमवारी पुण्यात तर मंगळवारी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली. मान्सूनची रेषा उत्तर कोकणाचा भाग व्यापून मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथेही अनेक भागांमधून प्रवास करत वर्ध्यापर्यंत पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर रेंगाळलेला मान्सून सोमवारपासून कमालीचा वेगवान झाला. सध्या त्याचा वेग प्रचंड असून अवघ्या २४ तासांत मंगळवारी त्याने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या पश्चिम दिशेकडून येणारे वारे मान्सूनला चालना देत आहेत, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस राज्यात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या काही तासांमध्ये या भागांमधील पावसाचा जोर वाढणार असून ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक, जळगाव पाठोपाठ आज आता …
पुण्यानंतर मुंबईपाठोपाठ संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भाग मान्सूनने एकाच दिवसात व्यापला. नाशिक, जळगाव पाठोपाठ आज आता उत्तर महाराष्ट्रातील फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तो जायचा बाकी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही बुधवारी (ता. 24) विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 30 ते 40 किमी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मान्सूनचा सध्याचा वेग इतका प्रचंड आहे की, या आठवड्यात राज्यातील बहुतांश धरणांत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल




















