पिंपळगाव बसवंत येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात उद्या, सोमवार, दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी “रेडीएशन मॅन” डॉ. अनिल काकोडकर हे कांदा साठवणुकीचे नवे तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासह पोखरण अणु स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. काकोडकर यांनी कृषी माल साठवणुकीची चिंता मिटविणाऱ्या रेडिएशन तंत्रज्ञान संशोधधाला दिशा दिली आहे. सरकारच्या प्रस्तावित “कांदा बँक” तंत्रज्ञानाचे ते प्रणेते आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मालामाल करणारा मंत्र देणारे डॉ. काकोडकर यांचे सोमवारी (15 जानेवारी) चे मार्गदर्शन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असेल.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात सोमवारी सकाळी 11 वाजता डाळींबावर, दुपारी 12 वाजता दूध व्यवसायावर तर 1 वाजता कांदा बँक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “कांदा बँक व शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा” या विषयावर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कांदा बँकेचे प्रमुख सल्लागार डॉ. अनिल काकोडकर हे मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी, 11 वाजता वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. बी. टी. गोरे हे “डाळींब पीक व्यवस्थापन” तर 12 वाजता डेअरी तज्ञ डॉ. इरफान खान हे “आदर्श दुग्ध व्यवसाय” यावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड आदर्श डाळींब पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श कांदा उत्पादक पुरस्कार आणि ॲग्रोवर्ल्ड आदर्श दूध उत्पादक पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
कृषी माल साठवणुकीसाठी रेडिएशन तंत्रज्ञान
फळे आणि भाजीपाला यांसारखा नाशवंत कृषी माल योग्य साठवणूक सुविधांअभावी फेकून द्यावा लागत असून अन्नधान्य महागाई वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. कांदे, बटाटे आणि टोमॅटो यांसारख्या कृषी उत्पादनांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या साठवणुकीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) विकसित केलेल्या किरणोत्सार तंत्रज्ञानाचा (रेडिएशन) वापर करण्याबाबत सरकारकडून सध्या धोरण आखले जात आहे. या तंत्राने कृषी उत्पादनांचे आयुष्य वाढून महागाई कमी होण्यास मदत होऊ शकेल का, याबाबत चाचपणी सुरू आहे.
भाभा अणु संशोधन केंद्राचे अनोखे तंत्रज्ञान
कृषी माल जास्त काळ टिकवण्यासाठी भाभा अणु संशोधन केंद्र, बीएआरसीने रेडिओअॅक्टिव्ह तंत्रज्ञान विकसित केले आहे. डॉ. अनिल काकोडकर हे या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. डॉ. काकोडकर यांना केंद्र सरकारतर्फे झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. कृषी मालाच्या अपु-या पुरवठय़ामागे योग्य साठवणूक तंत्रज्ञानाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. रेडिओअॅक्टिव्ह तंत्रज्ञानाने यावर मात केली जाऊ शकते.
प्रत्येक शहरात रेडिएअशन केंद्र उभारणार
केंद्र सरकार सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये रेडिएअशन केंद्र स्थापन करण्याबरोबरच प्रत्येक मोठय़ा शहरात या केंद्राची उभारणी करण्याच्या विचारात आहे. “रेडिओअॅक्टिव्ह तंत्रज्ञानामुळे नाशवंत कृषी माल जास्त काळ टिकवणे शक्य आहे. महाराष्ट्रात लासलगावसह अशी दोन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांचा आकार लहान आहे. ही केंद्रे सुरक्षित तर आहेतच, शिवाय खर्चही फारसा येत नाही.
भारताने कांद्याच्या मदतीने बनवला होता पहिला अणुबॉम्ब
पोखरणमध्ये आपली ताकद दाखवून देत जगाला धक्का देणाऱ्या भारताने कांद्याच्या मदतीने पहिला अणुबॉम्ब बनवला होता, हे फारच कमी जणांना माहिती असेल. भारताच्या अणुप्रगतीत डॉ. कलाम यांच्यासह डॉ. काकोडकर यांचीही मोलाची भूमिका आहे. मात्र, ते प्रसिद्धीपासून नेहमीच चार हात दूर राहतात. पोखरणमध्ये अणुबॉम्बची चाचणी केली गेली, तेव्हा तेथे अनेक टन कांदा खाली जमिनीत दाबण्यात आला होता. अत्यंत गुप्त पद्धतीने हा ‘व्हाइट हाऊस’ प्रयोग करताना अवघ्या काही मिनिटांतच 58 किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची चाचणी करून संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी चाचणीदरम्यान कांद्याचा वापर केल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. असे का केले गेले होते? कांद्यात अशी कोणती अद्भुत शक्ती असते, ते उद्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात खुद्द डॉ. काकोडकर यांच्याकडूनच जाणून घेता येणार आहे.
कांदा बँकेची नेमकी संकल्पना शेतकऱ्यांना कळणार
कांद्याला नऊ महिने कोणतीही काजळी न लागता, कोंब न येता, वजनात घट न येता चव व दर्जा कायम राखणारे तंत्रज्ञानही “बीएआरसी”ने विकसित केले आहे. त्याची माहिती देणारा इन्फ्राकूल कंपनीचा स्टॉलही प्रदर्शनात आहे. याच तंत्रज्ञानावर आधारित कांदा बँक जाळे राज्यात उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नागपूर अधिवेशनात केली आहे. या कांदा बँकेची संकल्पना डॉ. काकोडकर यांचीच असून ते या प्रकल्पाचे मुख्य सल्लागार आहेत. कांदा साठवणूक सोपी झाल्यास उत्पादनाला योग्य भाव मिळेलच मिळेल. तेव्हा ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील उद्याचे डॉ. काकोडकर यांचे मार्गदर्शन मुळीच चुकवू नका.