“द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनो, आपापसात स्पर्धा करू नका, विज्ञान विसरू नका, तंत्रज्ञान फायद्यासाठी वापरू नका,” असा महत्त्वाचा कानमंत्र द्राक्षगुरू अनिल म्हेत्रे यांनी शनिवारी दिला. “निर्यातक्षम द्राक्ष पीक व्यवस्थापन” याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सेमिनार हॉलमध्ये गर्दी केली होती. अनेकांनी शेवटपर्यंत उभे राहून तज्ञांची भाषणे पूर्ण ऐकली.
प्रमिला लॉन्स ग्राऊंड, पिंपळगाव बसवंत येथे 15 जानेवारीपर्यंत ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश असून पार्किंगची निःशुल्क व्यवस्था आहे. प्रदर्शनात रविवार, 14 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी व ॲग्रोवर्ल्ड कृषी-ऋषी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
यावेळी प्लँटो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी, काठे द्राक्ष परिवाराचे अध्यक्ष वासुदेव काठे, विभागीय जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, इन्फ्राकूलचे के.के. अग्रवाल, प्रगतिशील शेतकरी शंकरआप्पा बनकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांचा ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी सत्कार केला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड आदर्श द्राक्ष उत्पादक पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी मित्र पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले.
शेतकरी सर्रासपणे करताहेत एकमेकांची कॉपी
अनिल म्हेत्रे यांनी द्राक्षशेतीपुढील दोन आव्हानांबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन केले. त्यात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादनात येणारी अडचण आणि द्राक्ष उत्पादनानंतर निर्यातदारांना येणारी आव्हाने यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली. शेतकरी सर्रासपणे एकमेकांची कॉपी करत आहेत. त्यातून अज्ञानामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. शेतकरी मूलभूत विज्ञानापासून लांब जात आहेत, अशी खंत म्हेत्रे यांनी व्यक्त केली. शेतकरी, शास्त्रज्ञ, कंपनी आणि व्यापारी या चौघांना एकाचवेळी एकाच व्यासपीठावर बसवायला हवे, अशी सूचना म्हेत्रे यांनी केली. सध्या हे सर्व एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडतात, त्यातून समस्या सुटत नाहीत, तर गुंता वाढतो. शेतकरी व व्यापारी दोघांच्या दृष्टीने गोल मण्यांच्या द्राक्षात फुगवण आणि लांब वाणाच्या द्राक्षात लांबी हे समान आव्हान असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. द्राक्षाचा आकार आणि लांबी याचा हव्यास चुकीचा असून त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून आता आयातदारांना समजवायला हवे, की मालाची सर्व गुणवत्ता आम्ही देऊ; पण फुगवण आणि लांबीचे एका मर्यादेपलीकडे बंधन घालू नका, असा अत्यंत महत्त्वाचा मंत्र म्हेत्रे यांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांना दिला. गावातील एकाच शेतकऱ्याच्या सर्वात फुगीर गोल मणी आणि लांबीवरून सर्वच गावाचे भाव ठरविणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पादन घेतल्याने नव्हे तर उत्पादन काढताना चुकीच्या कल्टीव्हेशन प्रॅक्टीसमुळे जमीन खराब होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
फळमाशीचे संकट जगभर – वासुदेव काठे
वासुदेव काठे यांनी जगभरातील फळमाशीच्या संकटाची भीषणता विषद केली. त्यामुळे खराब मणी असलेला माल काढून घेऊन तात्काळ नष्ट करण्याचा सल्ला त्यांनी द्राक्ष उत्पादकांना दिला. सांगलीत असलेली ब्राऊनिंग
(ब्रूचींग) समस्या आता नाशिकच्या वडनेर भैरव भागातही सतावत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पूरक उद्योग सुरू करावा – संभाजी ठाकूर
संभाजी ठाकूर यांनी ग्लोबल वॉर्मिगमुळे अनेक पिकांवर परिणाम होत असल्याचे सांगितले. भविष्यात वाईट परिणामांची भीती असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून राहू नये. कृषी पूरक उद्योगधंदा, जोडधंदे, कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा. सर्वांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
ॲग्रोवर्ल्डच्या रोपट्याची वाढ होतानाचा साक्षीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये आवाहन केल्यानुसार ज्वारी, बाजरी, नागली, कोदरे, फुटकी, भगर या श्री धान्यांचा दैनंदिन आहारात वापर आवश्यक आहे. आहारातील गहू, भात याचे प्रमाण कमी करून श्री धान्य वाढवायला हवे, असे ठाकूर यांनी सांगितले. पुढील पिढीचे आरोग्य चांगले राहील, याची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. ॲग्रोवर्ल्डच्या रोपट्याची वाढ होतानाचा साक्षीदार असल्याचे आवर्जून सांगितले. आपण ऑफिसर म्हणून कार्य सुरू केल्यापासून ही सारी प्रगती पाहतोय, असेही ते म्हणाले.