एल-निनोमुळे गेल्या 110 वर्षांतील सर्वात कमी पाऊस नोंदविला गेलेल्या यंदाच्या ऑगस्ट महिन्यात खान्देशमध्येही पावसाची मोठी तूट राहिली आहे. आधीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झालेला आहे.
एल-निनोचा प्रभाव संपूर्ण भारतात पहायला मिळत आहे. मॉन्सून-2023 मध्ये जुलै मधील 15 दिवस फक्त चांगला पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. सोबतच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे पिवळ्या रंगाने दर्शविलेल्या जिल्ह्यात -60 ते -99% टक्के कमी पाऊस झाला, तर लाल रंगामध्ये दर्शविलेल्या जिल्ह्यांत -20 ते -59 टक्के कमी पाऊस ऑगस्टमध्ये झालेला आहे.
एल-निनोचा विपरीत परिणाम : हवामान स्थिती बघता एल-निनोचा विपरीत परिणाम मॉन्सूनवर अजूनही होत आहे. आता सप्टेंबरमध्ये हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन मॉन्सून पुन्हा सक्रीय होऊ पाहत आहे. त्याचबरोबर सकारात्मक IOD मुळे मॉन्सून सक्रीय होण्यास मदत होईल. मान्सून आस दक्षिणेकडून मध्य भारताकडे सरकेल. यामुळे सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस राहणार आहे. आता विदर्भ, मराठवाडामध्ये पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 2-4 दिवस राज्याच्या काही तुरळक भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाच्या प्रमाणात वाढ होणार : येत्या काही दिवसात विदर्भात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल आणि काही भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर राहील. याशिवाय, आता एक कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात 4-5 तारखेला सक्रीय होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे 6 सप्टेंबरनंतर विदर्भ, मराठवाडामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. पावसाची व्याप्ती आणि तीव्रता कमी दाब क्षेत्राच्या मार्गावर अवलंबून राहिल.