राज्यातील विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी “स्कायमेट”ने एक चांगली बातमी दिली आहे. “स्कायमेट” या खासगी हवामान अंदाज संस्थेच्या अनुमानानुसार, 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, 9 सप्टेंबरनंतर पाऊस कोकणात जाऊन बरसणार आहे. त्यामुळे आता या चार दिवसातील पावसावर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची सारी भिस्त आहे. या पाऊस चांगला बरसला नाही तर मात्र बळीराजाची चिंता वाढू शकते.
सध्या ईशान्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिचलन आहे. त्याच्या प्रभावाखाली कमी दाबाचे क्षेत्र आता अतितीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसात कोरड्या राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे.
राज्यात गेल्या 48 तासांत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यात वर्धा येथे 61 मिमी, नागपूरमध्ये 45 मिमी, ब्रम्हपुरीमध्ये 31 मिमी, अलिबागमध्ये 14 मिमी, महाबळेश्वरमध्ये 10 मिमी पावसाचा समावेश आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण या चारही उपविभागांमध्ये लवकरच चांगला पाऊस पडेल.
राज्यात आज, 5 सप्टेंबर रोजीही पाऊस पडेल; पण त्याचा जोर तितका मुसळधार असणार नाही. विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कालपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे, तो आजही कायम राहू शकतो. 6 सप्टेंबरपासून मात्र चित्त बदलणार आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7-8 सप्टेंबरलाही मुसळधार पाऊस पडू शकतो. 9 तारखेलाही पावसाचा जोर सर्वत्र चांगला राहू शकतो. यानंतर पाऊस कोकण विभागाकडे वळेल आणि त्याच भागापुरता मर्यादित राहील.
आता पुढचे काही दिवस पावसाचे
पुढील काही तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (एलपीए) तीव्र होण्याची अपेक्षा आहे. यामुळे संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. 10 सप्टेंबरपर्यंत ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, झारखंड आणि उत्तर भारतातील राज्यांमध्येही या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल.
येत्या 4-5 दिवसात विदर्भ, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच कोकणच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडेल. पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार शहरात चांगला पाऊस होईल, असा “स्कायमेट”चा अंदाज आहे.
तेलंगणा, कर्नाटक, दक्षिण भारतातही पाऊस
नव्या मान्सून सिस्टीममुळे, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पुढील 2-3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, देशाच्या दक्षिणेकडील भागातही मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात मुख्यत: चांगला पाऊस राहील. उर्वरित दक्षिण भारत, केरळपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस होईल. कोकण ते केरळपर्यंत पश्चिम घाटाचा संपूर्ण भागात आगामी आठवड्यापेक्षा जास्त काळ मान्सून सक्रिय स्थितीत राहू शकेल. 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकण, गोवा, किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
आणखी एक चांगली बातमी
मान्सूनचा हा सक्रिय टप्पा कमी होईपर्यंत, बंगालच्या उपसागरावर आणखी एक नवी मान्सून प्रणाली दिसू शकते. उत्तर आराकान किनारा आणि बंगालच्या उपसागराच्या जवळ एक नवे चक्रवाती परिवलन विकसित होत असल्याचे दिसत आहे. ही सिस्टीम मजबूत झाल्यास तिचाही महाराष्ट्राला फायदा होऊ शकतो.