मुंबई : हवामान खात्याचा अंदाज जोरदार पावसाचा असला तरी, ताज्या रडार स्थिती निरीक्षणानुसार, राज्यातील बहुतांश अनुशेषाच्या भागात आज पाऊस हलका-मध्यमच राहील, अशी शक्यता दिसत आहे. हा पाऊस कोकण किनारपट्टी, मुंबई अन् राज्यातील घाट परिसरातच केंद्रीत राहण्याची शक्यता असेल. याशिवाय, राज्यातील गुजरात अन् कर्नाटकलगतच्या काही भागातही पावसाची शक्यता दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज कोकणसह उत्तर व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या सर्व विभागांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.
कोकणसह राज्यातील घाटमाथा परिसरातही काल पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. हवामान खात्याने मात्र तळकोकणात पुढील 24 तास मुसळधार पाऊस बरसत राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. सिंधुदुर्ग भागाला सर्वाधिक फटका बसण्याचा “आयएमडी”चा अंदाज आहे. याशिवाय, विभागनिहाय विदर्भासह बहुतांश भागात यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने पुढील पुढच् 24 तासांसाठी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना जोरदार यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता असून तिथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यावरील आकाश आज अंशतः ढगाळ, विखुरलेले ढग
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी जारी केलेले आजचे अपडेटेड उपग्रह छायाचित्र पाहिले असता आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. होसाळीकर यांनी म्हटले आहे, की आज, 10 जुलै, सोमवार रोजी राज्यावरील आकाश अंशतः ढगाळ राहू शकेल. ढगही विखुरलेले असतील. सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम आहे. शिवाय, त्याचा एक भाग पूर्वेकडे सरकत आहे.
कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय
https://eagroworld.in/cotton-blight-crisis-do-so-solution/
16 जुलैपर्यंत राज्यात राहू शकेल पावसाची तूट
कोकण वगळता 16 जुलैपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पावसाची तूट राहू शकेल. सध्या मान्सूनला प्रतिकूल घडामोडी घडत असल्यामुळे 12 जुलैपर्यंत मान्सून राज्यात सक्रीय नसेल, अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. मान्सूनमधील अडथळ्यांमुळे, आगामी काही दिवस पुण्यासह कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र घाट परिसरातील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
कोकणात 12 जुलैनंतर पुन्हा वाढू शकतो पावसाचा जोर
12 जुलैनंतर मात्र पुन्हा तीन-चार दिवस राज्यात, विशेषत: कोकणात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. के.एस. होसाळीकर यांनीही IMD GFS मार्गदर्शनानुसार, 13- 14 जुलैपासून कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकेल. याशिवाय, बंगालच्या उपसागरात नवी मान्सून प्रणाली निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 18-20 जुलैपर्यंत पावसाचा आणखी एक सक्रिय स्पेल होण्याची शक्यता आहे, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
मुंबई शहर, परिसरात आज हलका-मध्यम पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता मुंबई महापालिकेने “आयएमडी”च्या हवाल्याने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासात मुंबई महानगरातील सरासरी पाऊस हलकाच राहिला. मुंबई शहरात 13.12 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 13.59 मिमी, पश्चिम उपनगरात 19.77 मिमी इतका पाऊस झाला.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM
खान्देशातील गेल्या 24 तासातील पाऊस
नंदुरबार जिल्हा : अक्कलकुवा – 41 मिमी, नंदुरबार – 29, नवापूर – 28, तळोदा – 24, धडगाव अक्राणी – 9, शहादा – 7 मिमी.
धुळे जिल्हा : दोंडाईचा – 25 मिमी, शिरपूर – 24, शिंदखेडा – 10, धुळे – 5, साक्री – 2 मिमी.
जळगाव जिल्हा : यावल – 52.8 मिमी, भुसावळ – 10, चोपडा – 10, धरणगाव – 8, बोदवड – 5, रावेर – 4, मुक्ताईनगर – 3, पाचोरा – 3, जामनेर – 0, चाळीसगाव – 0, एरंडोल – 0.
नाशिक जिल्हा : इगतपुरी – 61 मिमी, पेठ – 56, त्र्यंबकेश्वर – 16, दिंडोरी – 4, पिंपळगाव – 3.6, चांदवड – 3, कळवण – 3, देवळा – 2, येवला – 1, बागलाण – 0, नांदगाव – 0, सिन्नर – 0.
उल्हासनगर तालुक्यात राज्यातील सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर गेल्या 24 तासात कमी झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये वैभववाडीत 40 मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात 21 मिमी पाऊस नोंद झाला. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक 40 मिमी पाऊस पेण तालुक्यात झाला. गेले काही दिवस रोज 100 मिमी पर्यंत पाऊस होत असलेल्या माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 33.8 मिलिमीटर इतकाच पाऊस नोंदविला गेला. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झालेला आहे. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 59 मिमी तर राधानगरीत 31 मिमी पाऊस झाला. पालघर व ठाणे जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम राहिला. पालघरमधील जव्हार तालुक्यात 58 तर वाड्यात 51 मिमी पाऊस झाला. ठाण्यातील उल्हासनगर तालुक्यात राज्यातील कालचा सर्वाधिक 125 मिमी पाऊस झाला.