मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील तीन जिल्ह्यात ऑरेंज, तर 4 जिल्ह्यात Yellow Alert जारी केला आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीला समांतर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या सक्रिय मान्सून स्थिती कायम आहे. त्यामुळे 3 जुलैपर्यंत कोकणातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण व राज्यातील घाटमाथा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील पावसाचा जोर मात्र 30 जूननंतर कमी राहू शकेल.
मुंबईला गेले 2 दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोरही हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. 30 जूननंतर पाऊस हलका ते मध्यम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी, पावसाचा वेग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत यावर्षी बऱ्याच उशिरा मान्सून येऊनही जून महिन्याची सरासरी गाठली गेली आहे. जूनमध्ये आतापर्यंत मुंबईत 521 मिमी म्हणजे 97% पाऊस झाला आहे. त्यापैकी गेल्या सहा दिवसातच 503 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी वेळेवर मान्सून येऊनही जूनमध्ये फक्त 291 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. दरम्यान, पावसाने मुंबईतील दिवसाचे तापमान 30 अंशांच्या खाली आणले आहे. गुरुवारी कुलाबा वेधशाळेने 27.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ वेधशाळेत 29.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले.
राज्यातील पावसाचा जोर 30 जूननंतर ओसरणार
देशभरातील पावसाचा जोर 30 जूनपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. आज, शुक्रवारसाठी गोव्यात “आयएमडी”ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोव्यात 23 जूनपासून गेल्या सात दिवसात तब्बल 392 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामुळे पावसाची तूट बऱ्याच अंशी कमी झाली आहे. येत्या 2-3 दिवसानंतर पावसाच्या हालचालीत हळूहळू घट अपेक्षित आहे. महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आता ओसरत आहे. याशिवाय, दक्षिण गुजरातच्या आसपास असलेले चक्रीवादळ आणि आता मध्य प्रदेशच्या उत्तर भागाकडे सरकत असल्याने सध्याची मान्सून प्रणाली हळूहळू कमजोर होत होईल.
महाराष्ट्रातील आज-उद्याचे ऑरेंज अन् यलो अलर्ट (IMD Orange, Yellow Alert)
राज्यात आज पुण्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, मुंबई-ठाण्यासह, नाशिक आणि सातारा जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात आज फारशा पावसाची शक्यता नाही. या भागातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकेल.
राज्यात उद्यापासून (1 जुलै) सोमवारपर्यंत (3 जुलै) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या तीन दिवसात पुण्यासह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फक्त यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात, या कालावधीत, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.