मुंबई : कापसाच्या भाववाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात गेल्या आठवड्याभरात तब्बल 500 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे 8 हजाराच्या जवळपास पोहोचले आहेत.
राज्यात घेतल्या जाणार्या काही प्रमुख पिकांपैकी कापूस हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. कापसाचे उत्पादन आणि दरावर राज्यातील बाजापेठेचा अंदाज ठरविला जात असतो. अनेक उद्योग कापसाच्या उत्पानावर अवलंबून आहेत. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कापूस या पिकाची चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभरात कांदाच्या दराचा मुद्दा चांगलाच गाजला. तसा कापसाचा दराचा मुद्दा दरवर्षी चर्चीला जात असतो. मागील वर्षी शासनाकडून कापूस खरेदीला सुरुवात झाल्यानंतर 12 हजाराच्या जवळपास दर मिळाला होता. मात्र, जस जशी आवक वाढत गेली तस-तशी कापसाच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांचा चांगलाच हिरमोड होवून साठवणूकीकडे कल वाढला होता.
8 दिवसात दरात वाढ
यंदा कापसाला चांगल्याप्रमाणात दर मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी 7 हजाराच्या जवळपास होते. मात्र, या आठवड्याभरात कापसाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे कापसाचे दर 7,900 ते 8,100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे कापसाच्या भाववाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकर्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. पुढे कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दर स्थिरावण्याची शक्यता…
यंदा जगावर मंदीचे सावट असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या निर्यातीवर झाला आहे तसेच भारतीय कापसाचे इतर देशांच्या तुलनेने जास्त असल्याने देखील कापसाच्या निर्यातीत घट झाली आहे. या वर्षी कापसाचे दर 8 ते 9 हजाराच्या दरम्यान राहतील असा अंदाज महावीर जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे संचालक अरविंद जैन यांनी व्यक्त केला आहे.