तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण भारतात म्हैसूरनंतर सर्वात मोठा दसरा हा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात साजरा केला जातो. हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला तब्बल 167 वर्षाची परंपरा आहे. कृषी-औद्योगिक प्रदर्शन हे या दसऱ्याचे आणखी एक खास वैशिष्ट्य.
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर हा उत्सव भरतो. अनेक जिल्ह्यातील ग्रामस्थ हा उत्सव पाहण्यासाठी येतात. यात कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येते. 1885 मध्ये येथील कयाधू नदीच्या काठावर असलेल्या खाकीबाबा मठात संत मानदासबाबा उर्फ खाकी बाबा यांच्या पुढाकाराने दसरा सुरू झाला. रामलीला मंडळाद्वारे दहा दिवस रामलीला कार्यक्रम व हनुमान मूर्ती, हत्ती- घोडे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. दहा दिवस रामलीला पाहण्यासाठी येथे राज्यभरातून गर्दी होत असते.
ज्वारीच्या हायब्रीड वाणाचा, सरकारी योजनांचा प्रचार
पूर्वीच्या काळी नव्यानेच विकसित झालेल्या ज्वारी आणि अन्य पिकांच्या ‘हायब्रीड’ वाणाविषयी, सरकारी योजनांविषयी या दसरा मेळाव्यातून माहिती दिली जायची. याशिवाय, साक्षरता प्रसार, दारूबंदी, कुटुंब नियोजन इत्यादींविषयीची माहिती देणारे स्टॉल, व्यापारी स्टॉल, कृषी मशिनरी स्टॉल त्याकाळी दसरा महोत्सवात उभे राहत.
या दसरा महोत्सवात भरणाऱ्या कुस्त्यांच्या फडांचे पूर्वी खास आकर्षण असायचे. भरघोस नगदी ‘इनाम’ देणाऱ्या या फडास ‘दंगल’ असे म्हटले जायचे. कुस्ती स्पर्धेप्रमाणेच कबड्डी, हॉकी यांचे सामनेही भरवले जात. याशिवाय, सर्कस व तमाशा फड तसेच शंकरपट यामुळे हिंगोलीतील दसरा अगदी शाही व्हायचा.
1964 मध्ये पाहिले कृषी-औद्योगिक प्रदर्शन
नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे लहान- मोठे व्यावसायिक यांनी येथे स्टॉल लावण्यास सुरुवात केली. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. तत्कालीन निजाम शासनाने दसरा महोत्सवासाठी राखीव जागा म्हणून नोंद केली. 1950 च्या सुमारास व्यापारी, नागरिकांनी दसरा महोत्सव समितीची स्थापना केली. 1955 व्या वर्षात दसरा सणाच्या शताब्दी वर्षात रामलीला मैदानावर दसरा स्तंभ उभारला. इथे 1964 मध्ये कृषी-औद्योगिक प्रदर्शन सुरू झाले अन् हिंगोलीचा दसरा देशपातळीवर प्रसिद्ध झाला. आजही पूर्वीच्या दसऱ्यातील अनेक कार्यक्रम होतात, कृषी प्रदर्शनही भरवले जाते, ज्याला कृषी मेळा म्हटले जाते. कृषी पीक स्पर्धा घेतली जाते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी संस्कृतीचा दसरा सण; लहानपणीचा ज्वारीच्या कणसाचा बुडुक-बुडुक खेळ आठवतोय का?
- छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल ‘बायर’ची कमी पाण्यातील तांदळाची डीएसआर प्रणाली