मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मुंबई: केरळमध्ये गुरुवारी हजेरी लावल्यानंतर नैऋत्य मान्सूनने आपला उत्तरेकडील प्रवास वेगाने करत दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी गोवा किनारी धडक मारली. गोव्यात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) कडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहोचला असून राज्यासाठी हवामान स्थिती अत्यंत अनुकूल बनली आहे. १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
शुक्रवारी दुपारी मान्सूनने अरबी समुद्रासह गोव्याच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. सॅटेलाईट स्थितीनुसार, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर सध्या दाट ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती उत्तम आहे. तळकोकणात, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार?
मान्सून १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होणार असला, तरी त्यानंतर त्याचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व अलर्ट जारी
अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- कोकण आणि गोवा: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि डहाणू परिसरात आज ६ जून रोजी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर (घाट भागासह), सातारा (घाट भागासह), पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर.
- मराठवाडा आणि इतर: बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड.
मुंबईत आर्द्रता वाढण्याचा अंदाज
मुंबईत सध्या संमिश्र वातावरण असून काही भागांत ढगाळ हवामान तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. शनिवारी, ६ जून रोजी मुंबई व आसपासच्या परिसरात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!
यंदा देशात मान्सूनचे आगमन थोडे विलंबाने झाले आहे. कोकणात १० जून तर उर्वरित महाराष्ट्रात २० जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय अधिकृत पेरण्या सुरू करू नयेत, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टाळता येईल.
गेल्या वर्षीची (२०२५) स्थिती
गेल्या वर्षी २४ मे रोजी केरळमध्ये आलेला मान्सून अत्यंत वेगाने म्हणजेच २५ मे रोजीच तळकोकणात आणि २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. यंदा मात्र तो संथ आणि नियमित गतीने पुढे सरकण्याचा अंदाज आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल







