मान्सून माघार रेंगाळली; राज्यात या जिल्ह्यात होणार ‘रिटर्न मान्सून’चा शिडकावा
गेले 4 दिवस माघारीची रेषा हर्णे, बारामती, परभणी, ब्रह्मपुरी या पट्ट्यात एकाच जागी स्थिर

मुंबई : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाता-जाता मान्सून एक आनंद वार्ता घेऊन आला आहे. राज्याच्या निम्म्या भागातून मान्सून 3 ऑक्टोबर रोजीच संपला असला तरी गेले 4 दिवस त्याची माघार महाराष्ट्रात रेंगाळलेली आहे. मान्सून माघारीची रेषा हर्णे, बारामती, परभणी, ब्रह्मपुरी या पट्ट्यात एकाच जागी स्थिर आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून पूर्णपणे माघार घेण्यासाठी हवामान अनुकूल होण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
सध्या देशात विविध हवामान प्रणाली (सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि ट्रफ) सक्रिय असल्याने वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. काल, 7 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. तर, उत्तराखंडमध्ये आज आणि उद्या म्हणजे 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो.
दक्षिण भारतात केरळ आणि तमिळनाडूमध्ये 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याउलट, मध्य भारतातून मान्सून माघार घेत असल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण कमी होऊन हवामान प्रामुख्याने कोरडे होत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून 9 ऑक्टोबरच्या सुमारास तुरळक ठिकाणी अगदी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
View this post on Instagram
आयएमडी (IMD) च्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, नैऋत्य मान्सून माघारीची रेषा सध्या 27.5° उत्तर ते 86.5° पूर्व पट्ट्यात पुढील ठिकाणांवरून जात आहे – सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती, हर्णै.
राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस!
राज्यात सध्या प्रचंड उकाडा वाढला असून, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वैताग आणत आहे. या तापत्या ऑक्टोबर हीटमध्ये होरपळत असलेल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या अंदाजाने मोठा दिलासा मिळणार आहे. आयएमडीने राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
या काळात वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास होते, असे हवामान विभागाने सांगितले. हवामान विभागाने विदर्भातील वर्धा, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर इतर काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका वादळी पाऊस पडेल, असा इशारा दिला होता. उद्या आणि परवा म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार, 9-10ऑक्टोबर रोजीही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील मान्सून माघार
पुढील 2 ते 3 दिवसांत, म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून माघार घेण्यासाठी हवामान अनुकूल होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि गोवा: काल, 7 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. आता आज, 8 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे राहील, तर 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर 11 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
मराठवाडा: 7 ते 13 ऑक्टोबर काळात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भ: 7 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. आता 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहील.






