केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाहणीसाठी दाखल; 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आढावा सुरू

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे आंतर-मंत्रालयीन पथक गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एनडीआरएफ अंतर्गत जास्तीत जास्त मदत मागितली होती, त्यानंतर केंद्रीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पथक 8 ते 11 ऑक्टोबर या चार दिवस राज्यात राहणार आहे. पथकाचे नेतृत्व कृषी विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल करत असून यात कृषी, वित्त, ग्रामविकास, जलसंपदा, ऊर्जा विभागाचे अधिकारी आहेत. राज्य सरकारने 26 सप्टेंबर रोजी 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये (74%) दुष्काळ जाहीर केला आहे. यात 32 जिल्हे आणि 32,823 गावे बाधित असून मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणीत 80% पेक्षा जास्त खरीप पीक (सोयाबीन, कापूस) उद्ध्वस्त झाले आहे.
View this post on Instagram
केंद्राकडे 17,500 कोटींची मागणी
मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 13,000 कोटी पीक नुकसानीसाठी आणि 4,500 कोटी चाऱ्यासाठी अंतरिम मदत प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय पथक लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, नाशिक, वाशिम या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांना भेट देऊन पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि चारा टंचाईचा ग्राउंड रिपोर्ट तयार करेल. हा अहवाल आणि राज्याचा प्रस्ताव याच्या आधारे एनडीआरएफ अंतिम मदत ठरवणार आहे. अमित शहा यांनी “केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहील” असे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.





