आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हयातील अनेक गावांनी परिवर्तनाची वाट चोखाळली आहे. अशाच परिवर्तनशील गावांमध्ये दारव्हा तालुक्यातील गाजीपूरचा देखील समावेश होतो. बारमाही सिंचनाची सोय असलेल्या या गावाने व्यवसायीक पीकपध्दतीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यातूनच गावाचे अर्थकारण देखील बदलण्यास मदत झाली आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गाजीपूरने पेरला आशावाद…
तिळ पिकात मिळविली ओळख
गावात सुरुवातीला भुईमूूग लागवड क्षेत्र मोठे होते. या पीकात किडरोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्याच कारणामुळे उत्पादकतेत घट होत असल्याने शेतकर्यांनी हे पीक काढण्याचा निर्णय घेतला. सुमारे 200 एकरावर भुईमूंगाची लागवड होत होती. पर्यायी पिकाच्या शोधात असलेल्या शेतकर्यांनी त्यानंतर तीळ लागवडीवर भर दिला. या पीकातून चांगला पैसा जुळत असल्याने टप्याटप्याने तीळ लागवड क्षेत्र 200 एकरावर पोचले.
अशी आहे लागवड पध्दत
दोन तासात सव्वा ते दिड फुट अंतर ठेवत ही लागवड केली जाते. एकरी बियाणे दर हा चार किलो राहतो. 500 रुपये किलो याप्रमाणे बाजारात तीळाचे बियाणे उपलब्ध होते. याची एकरी उत्पादकता चार ते पाच क्विंटल होते. बाजारात याला सरासरी 8 ते 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळतो. त्यानुसार एकरी 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न होते. याला एकरी उत्पादकता खर्च 8 हजार रुपयांचा होतो. त्यामध्ये तणनियंत्रणकामी लागणार्या मजूरांवरील खर्चाचा अधिक समावेश आहे. या पीकावर गादमाशीचा प्रादुर्भाव होतो. अवकाळी पाऊस झाल्यास भुरीचा देखील प्रादुर्भाव होण्याची भिती राहते. किडरोगाची शक्यता कमीच राहते. त्यामुळे किडनियंत्रणावरील खर्च वाचतो. शेतीपिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान ग्रामीण भागात गंभीर समस्या झाली आहे. परंतू तीळ या पीकाला वन्यप्राण्यांचा पण त्रास नसल्याने हे क्षेत्र सातत्याने वाढते आहे. अवघ्या 90 दिवसाचे हे पीक आहे. मुरलीधर दत्तराम महल्ले, प्रवीण कृष्णराव भोयर यांच्यासह अनेक शेतकरी तीळ लागवडीवर भर देतात.
कलींगडासाठी शोधली बाजारपेठ
तीळासोबतच या भागात कलींगड हे दुसरे व्यवसायीक पीक घेतले जाते. याचा एकरी उत्पादकता खर्च 40 हजार रुपये. उत्पादकता 25 ते 30 टन मिळते. दर 8 ते 10 रुपये किलोचा मिळतो. गावात कलींगडाखालील क्षेत्र अधिक असल्याने व्यापारी थेट बांधावर पोचत सौदे करतात. या भागातून थेट दिल्ली व देशाच्या इतर भागात कलींगड पाठविण्यात येते. गावातील जगदीश चव्हाण यांनी गावात सहा वर्षांपूर्वी कलींगड लागवडीवर भर दिला. त्यांना बाजारपेठ मिळाल्याने त्यांच्या अनुकरणातून पुढे क्षेत्र वाढले. आज गावातील 17 शेतकरी कलींगड लागवड करतात.
ऊस पीक लागवडीवर भर
पाण्याची उपलब्धता असल्याने गावातील 20 शेतकर्यांनी 30 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात सातत्याने राखले आहे. मांगूळ येथील डेक्कन कारखान्याला त्याचा पुरवठा केला जातो.
या माध्यमातून देखील अनेक शेतकर्यांचे अर्थकारण बदलले आहे. काही शेतकरी प्रायोगीक तत्वावर ऊसामध्ये कांदा
लागवडही करतात. त्यांना या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. ऊस काढणीनंतर हरभरा लागवडीचा पॅटर्न ही अनेकांनी राबवित यशस्वी करुन दाखविला.
शिवारात डोलते केळी
व्यवसायीक पीकाचा आदर्श जपणार्या या गावातील अनेक शेतकर्यांनी केळी लागवडीवरही भर दिला आहे. तीन हेक्टवर याची लागवड होते. मात्र नजीकच्या काळात अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. परिणामी अनेक शेतकर्यांनी केळी ऐवजी इतर पर्यायी पिकांचा विचार सुरु केला आहे.
कलींगडातून उत्पन्नाची लाली
गेल्या चार वर्षापासून कलींगड लागवडीकामी मल्चींगचा वापर शेतकर्यांव्दारे होऊ लागला आहे. बहूतांश शेतकरी मल्चींगवरच लागवड करतात. कलींगड काढणीनंतर याच मल्चींगचा वापर कापूस लागवडीकामी होतो. यातून पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत होते. कोरोनाकाळात शेतकर्यांना बाजारपेठेची अडचण निर्मण झाली होती. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी पुढाकार घेत कलींगड उत्पादक शेतकर्यांच्या वाहनांसाठी विशेष वाहतूक पास उपलब्ध करुन दिल्या.
त्यासोबतच यवतमाळ बाजारपेठेत थेट विक्रीसाठी जागाही उपलब्ध करुन देण्यात आली. या माध्यमातून होणारे संभावीत नुकसान काही अंशी टाळण्यास मदत झाल्याचे शेतकर्यांनी सांगीतले. कलींगडाच्या काढणीनंतर काही शेतकरी कोहळे लागवड करतात. 10 ते 12 रुपये किलोचा दर मिळतो. कोहळ्यासाठी एकरी 800 ग्रॅम बियाण्यांची गरज राहते. हा खर्च वगळता इतर कोणत्याच प्रकारचा खर्च या पीकाच्या व्यवस्थापनावर होत नाही, असे शेतकर्यांनी सांगीतले.
कृषी विभागाने दिले बळ
स्वयंस्फुर्तीने प्रयोगशीलता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब या गावातील शेतकरी करतात. एक पीक पध्दती फायदेशीर ठरल्याने गावातील इतर शेतकरी अनुकरणातून त्याचा अवलंब करण्यासाठी पुढे येतात. गाजीपूरचे आणखी एक वैशिष्टय सांगायचे झाल्यास गावात कोणतेही हेवेदावे नाहीत. त्यामुळेच सामूहिक प्रयत्नातून गाव स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना योजनांच्या माध्यमातून बळ देण्याचे काम कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ अंतर्गंत असलेल्या प्रादेशीक संशोधन केंद्राच्या माध्यमातून होते. महाडिबीटमधून कृषी विभागाने अनेक योजनांचा लाभ दिला आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर, ठिबक, स्प्रिंकलर यासारख्या अनुदानात्मक योजनांचा समावेश आहे. गावात सुमारे 20 ट्रॅक्टर आहेत. दैनंदीन शेती व्यवस्थापनात त्याचा उपयोग होतो.
पाणी मुबलक तरी ठिबकवर भर
गावशिवारात अरुणावती प्रकल्प, महागाव परिसरात नव्याने प्रकल्प झाला आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात या गावाचा समावेश होतो. त्यामुळेच गावाच्या भुजल पातळीत वाढ झाली आहे. गावातील 90 टक्के शेतकर्यांच्या शिवारात सिंचनासाठी विहिर तसेच बोअरवेलचा पर्याय आहे. त्या माध्यमातून ओलीताची सोय केली जाते.
गावात टूमदार घरे
कांदा, गहू, हरभरा, लसून, कापूस, सोयाबीन, मोसंबी, यासारखी पिके घेण्यावर शेतकर्यांचा भर आहे. बारमाही पीक शिवारात घेतली जात असल्याने गावाने संपन्नतेची वाट चोखाळली आहे. गावात प्रवेश करताच टूमदार घरे आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. गावशिवाराची संपन्नता सिध्द करण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरते.
दूध संकलन केंद्र
गावातील काही शेतकर्यांकडून दूधाळ जनावरांचे संगोपन होते. त्यांच्या माध्यमातून 60 लिटर दूधाचे संकलन होते. गावातील संकलन केंद्रावर याचा पुरवठा होतो. लगतच्या गावातील देऊरवाडी, वडगाव, मोझर या गावातून देखील गाजीपूर येथील संकलन केंद्रावर दूधाचा रतीब घालण्यात येतो.
सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन
गावातील अनिल पांडूरंग गव्हाणे यांनी गावात प्रयोगशीलतेची रुजूवात केली, असे सांगीतले जाते. अनिल गव्हाणे हे गेल्या तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. त्याकरीता गोमृत, जीवामृत व इतर घटकांचा वापर होतो. ते गहू, कांदा, हरभरा, ऊस यासारखी पीक घेतात. मजूरांच्या उपलब्धतेची अडचण लक्षात घेता बहूतांश शेतकर्यांचा ठिबकद्वारे खत देण्यावर भर आहे.
दृष्टीक्षेपात गाव
एकूण गावाचे क्षेत्र 266 हेक्टर
वहितीलखाली क्षेत्र 266 हेक्टर
लोकसंख्या 860
शेतकरी संख्या 175
पाण्याची उपलब्धता असली तरी पिकाला योग्य प्रमाणात खत आणि पाणी मिळावे याकरीता शेतकर्यांनी ठिबकचा पर्याय अवलंबिला आहे. त्यासोबतच तांत्रीक माहितीचे अपग्रेडेशन, सामूहिक चर्चेतून प्रश्नांची सोडवणूक या बाबींवर शेतकरी भर देतात ही बाब निश्चीतच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी विद्यापीठाकडून देखील या गावातील शेतकर्यांना मार्गदर्शनावर भर दिला गेला आहे.
– डॉ. प्रमोद यादगीरवार,
प्रमुख, प्रादेशीक संशोधन केंद्र, यवतमाळ
गाजीपूर गावातील शेतकर्यांचा उत्साह पाहता त्यांना तांत्रीक मार्गदर्शन व अनुदानात्मक योजनांचे पाठबळ देण्यात आले आहे. शेतकर्यांमध्ये आधुनीक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढावा याकरीता कृषी विभागाची यंत्रणा प्रयत्नशील राहते. त्यातूनच गावात विविध ट्रॅक्टरचलीत सयंत्राची उपलब्धता करण्यावर शेतकर्यांनी भर दिला आहे.
– नवनाथ कोळपकर,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.
कांदा छाटणीकामी सयंत्र
कांद्याचा अनावश्यक भाग काढण्यात येतो. महिला मजूरांना त्यासाठी 120 रुपये मजूरी द्यावी लागते. एका दिवसात एक महिला केवळ एक पोत्याचीच कापणी करते. याउलट बॅटरी चलीत मशीनने हे काम एका दिवसात वीस पोते याप्रमाणे शक्य होते, असा दावा ओंकार काळमेघ या शेतकर्याने केला. त्यांनी बॅटरी चलीत हे छोटेसे आणि हाताळण्याकामी सोपे यंत्र उपलब्ध करुन घेतले आहे. साडेतीन हजार रुपयांना ते मिळते. त्यामध्ये एक बॅटरी आणि एक ब्लेडचा वापर केला आहे. त्यांना यावर्षी दिड एकरातून 170 क्विंटल कांदा उत्पादन झाले आहे. गावातीलच रेखा रमेश म्हस्के यांची सहा एकर शेती असून त्यांना एकरी 130 क्विंटल कांदा झाला आहे.
– ओंकार काळमेघ, संपर्क ः 7218728509
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
फलटणचा उच्चशिक्षित 28 वर्षीय तरुण करतोय आधुनिक हायड्रोपोनिक शेती!
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
Comments 1