जळगाव : शेतकऱ्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य ती काळजी घेतली तर कांदा पीक उत्पादन वाढेल. त्यामुळे याची लागवड पध्दत ते काढणीपर्यंतचा प्रवास शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे 1 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर सातारा हे जिल्हे कांद्यासाठी प्रसिध्द आहेत. रब्बी हंगामातील विक्रमी कांदा उत्पादनासाठी आपल्याला फक्त एवढी काळजी घ्यावी लागेल. काय ती जाणून घेऊ…
रब्बी हंगामात 10 x 10 सेंमी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बन्डॅझिम व 10 मिली. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल टाकून द्रावण करावे. रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
पाणी व्यवस्थापन
जमीन कोरडी असताना लागवड केल्यास वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर पाणी तोडावे. रब्बी हंगामातील पिकांना शेवटी पाण्याची कमतरता भासते. त्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडावे व 50 टक्के झाडांच्या माना पडल्यावर कांदा काढणीस सुरुवात करावी.
खत व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी 40 ते 50 बैलगाड़या शेणखत व शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाशपैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे. राहिलेले 50 किलो नत्र 30 व 45 दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे. साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही खत देऊ नये.
रोग व किडींचे व्यवस्थापन
कांदा पिकावर रब्बी हंगामात प्रामुख्याने तपकिरी करण्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानावर बाहेरील भागावर दिसू लागतात. शेंड्यांपासून पाने जडल्यासारखे दिसतात. चठ्ठयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. 15 ते 20 अंश सें. तापमान व 80 ते 90 टक्के आद्रतेमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते. ढगाळ वातावरण या रोगास फारच पोषक ठरते.
जांभळा करपा रोगाचाही याच कालावधीत प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे चठ्ठयांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट होऊन नंतर काळपट पाने करपतात. फुलकिडे ही कांदा पिकाचे नुकसान करणारी मुख्य कोड आहे. या किडीची पिले व प्रौढ कीटक पानातील ठिपके पडतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या बुरशीस सहज शिरकाव करता येतो. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास रोगांचे प्रमाणही वाढते.
कोरडी हवा आणि 25 ते 30 अंश सें. तापमानात या किडीचे प्रमाण जास्त असते. करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित रोग व कीड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर 10-15 दिवसांनी व 15 दिवसांच्या अंतराने चार फवारण्या मॅन्कोझेब (0.3 टक्का) किंवा काबॅन्डॅझिम (0.1 टक्का) हे बुरशीनाशक व डायमेथोएट 30 ईसी 13 मिली. किंवा लॅम्बडा सायहॅलोश्रीन 5 ईसी 6 मिली. किंवा क्रिनॉलफॉस 25 ईसी 24 मिली. या कीटकनाशकाच्या आलटूनपालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना चिकट द्रवाचा (0.1 टक्का) वापर जरूर करावा.
तण नियंत्रण
कांदा रोपलागवडीनंतर खुरपणीसाठी खूप खर्च येतो. खुरपणीमुळे मुळाशी हवा खेळती राहून कांदा चांगला पोसतो. रब्बी 25 दिवसांनी ऑक्झफ्लोरफेन 7.5 मिली. व क्युझेंलोफॉप इथाईल 10 मिली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी. त्यानंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी.
काढणी
जातीनुसार आणि हवामानानुसार कांदा पक्र होऊ लागला की, नवीन पाने यायची थांबतात. यावेळी कांदा काढणी साठी तयार होतो.
उत्पादन
एन-2-4-1 : कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग चकाकी येते. 5-6 महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर 120 दिवसांनी काढणीस येतात. हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- रब्बीत गहू लागवडीतून मिळवा बंपर उत्पादन ; जाणून घ्या.. ”जमीन, हवामान, पूर्वमशागत आणि पेरणी” भाग – 1
- गहू लागवड : जाणून घ्या… ”पेरणीनंतरचे ते काढणी पर्यंतचे व्यवस्थापन” भाग – 2