नाशिक : महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून पिंपळगाव बाजार समिती उत्पन्नात उत्तर महाराष्ट्रात प्रथम आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे आमदार दिलीपराव बनकर यांनी बाजार समित्यांची उत्पन्न बाबतची माहिती मागितली असता पिंपळगाव बाजार समिती उत्पन्नात प्रथम असल्याची स्थिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या आहेत. त्यात २९५ बाजार समितींच्या उत्पन्नात मर्यादीत कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये पिंपळगाव बाजार समिती उत्तर महाराष्ट्रात प्रथम आली असून लासलगाव बाजार समिती द्वितीय स्थानावर आहे.
प्रादेशिक बाजार समित्यांमध्ये ही बाजार समिती पहिल्या क्रमांकावर
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मिळालेल्या उत्पन्नाबाबतची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी मागविली होती. बनकर यांना ३०६ बाजार समित्यांपैकी २९५ बाजार समित्यांची उत्पन्नाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार मुंबई ही राज्यातील प्रादेशिक बाजार समितीत १०१,५८,२०,८२७ रुपये उत्पन्न मिळवित पहिल्या क्रमांकावर असून पुणे ७६,१०,३२,९४३ रुपये उत्पन्न मिळवीत दुसऱ्या क्रमांकावर तर नागपूर ३०,३०,१४,७०४ रुपये उत्पन्न मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये सोलापूर पहिले
सोलापूर हे मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये २५,२०,४१,७१७ रुपये उत्पन्न मिळवीत पहिल्या क्रमांकावर आहे. आणि लातूर २४,२०,८४,२९६ रुपये उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पिंपळगाव बसवंत २१,९६,८७,२४८ रुपये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लासलगाव १९,३५,३७,४९४ रुपये उत्पन्न मिळवीत चौथ्या क्रमांकावर तर अमरावती हे १७,८१,९५,३४४ रुपये उत्पन्न मिळवीत पाचव्या स्थानावर आहे.