नेपाळमधील पहाडी शेती आणि कष्टकरी गुंठाधारी शेतकरी यांच्या जिद्दीची, संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे. शेतकर्यांसाठी बारमाही वाहणार्या नद्या वरदान आहेत. मात्र, माकडे, रानडुकरे, हत्तींचा उपद्रव आहेच. त्याला तोंड देत, हिमतीने मार्ग काढत निसर्गाशी प्रामाणिक राहून इथे शेती जोपासली जाते.
मागील भागात आपण नेपाळमधील ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक व सांस्कृतिक माहिती घेतली. आता आपण नेपाळमधील शेतीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. शेतीसारखा लोकजीवन व संस्कृतीशी निगडित अफाट विषय संक्षेपात, नेमकेपणाने मांडण्यासाठी नेपाळमधील स्थानिक कृषी केंद्र चालक निर्मल पोखरी यांनी मदत केली. याशिवाय सहल मार्गदर्शक (टूर गाईड) नरोत्तम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळेच हा विषय तुमच्यापर्यंत पोहचविता येत आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
भारताच्या तुलनेत नेपाळमधील शेती आव्हानाची
जगात कोठेही जा, शेती उत्पादन हे काही नैसर्गिक गोष्टीवर अवलंबून आहे, हे निखळ सत्य आहे. याचा अभ्यास करून व वेळ प्रसंगी निसर्गाशी दोन हात करून जो शेतकरी उत्पादन घेतो, तो आपल्यासाठी आदर्श ठरतो. त्याचे अनुकरण मात्र बरेचसे शेतकरी करत नाही. भारतीयांचा हा आता नैसर्गिक, मानवी स्वभाव झालाय. नेपाळच्या कष्टकरी शेतकर्याचा आदर्श घेतल्यास आपल्याला अधिक प्रयोगशील होता येईल. समस्यांचा बाऊ न करता, फारशी सरकारी मदतीची अपेक्षा न धरता मार्ग काढून उत्पन्नवाढही पदरात पाडून घेता येऊ शकेल. नेपाळच्या तुलनेत भारतीय शेती खूपच सोपी असून आपल्या शेतकर्यांपुढे आव्हानेही कमी आहेत.
शेतीची तीन प्रमुख भागात विभागणी
नेपाळमधील शेती भौगोलिक दृष्टीने अवघड असली तरी सुपीक व समृद्ध आहे. नेपाळमधील शेतीची तीन विभागात विभागणी केली जाते.
1) हिमालयीन प्रदेशातील शेती 2) पहाडी भागातील शेती
3) समतल भागातील शेती
या तिन्ही भागातील शेतकरी जे-जे पिकवतात ते-ते विपुल व उच्च दर्जाचे असते; पण नेपाळच्या जनतेला लागणारे धान्य हे बहुतांशी तिसर्या भागातच पिकते. मात्र, ही जमीन एकूण जमिनीच्या तुलनेत फक्त 17 टक्के आहे. नेपाळचे एकूण क्षेत्रफळ एक लाख सत्तेचाळीस हजार वर्ग किलोमीटरपेक्षा थोडे जास्त आहे.
वर्षातील कोणत्याही काळात पडतो पाऊस
या देशात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात पावसाळा असतो. तरीही वर्षातील कोणत्याही महिन्यात येथे पाऊस पडतो. त्यामुळे येथील नद्यांना बारमाही पाणी असते. जगातील सर्वात जास्त नद्या असणारा हा दुसरा देश आहे. या देशात 6,000 पेक्षा जास्त नद्या असून त्या सर्वांची मिळून 4,500 कि.मी. लांबी आहे. त्यामुळेच की काय, या नद्यांवरील वीज प्रकल्पातून 83,000 मेगावॅट वीज तयार केली जाते.
देशात चार ऋतू; शिशिरात हिमवर्षाव
नेपाळमध्ये 4 ऋतू आहेत. यात वसंत ऋतू मार्च ते मे असतो. या काळात तापमान 10 ते 25 अंश सेल्सिअस असते. वर्षा ऋतूचा काळ जून ते ऑगस्ट असतो. त्यावेळी तापमान 28 ते 40 डिग्री असते. शरद ऋतूचा काळ सप्टेंबर ते नोव्हेंबर/डिसेंबर असून या काळात तापमान -5 ते 15 डिग्री असते. शिशिर ऋतूचा काळ डिसेंबर/जानेवारी तें मार्च सुरुवातीपर्यंत असतो. या काळात -3 ते 12 डिग्री तापमान असते. विशेष म्हणजे चार ऋतूंपैकी पहिल्या तीन ऋतूमध्ये 100 ते 200 मीमी पाऊस पडतो. चौथ्या ऋतूत हिमवर्षाव असतो.
भारत, चीनमधून येतात रासायनिक खते
नेपाळमध्ये येणारी रासायनिक खते भारतातून येतात, तर काही खते व कीटकनाशक चीनमधूनही येतात. थंडी व पावसाचे प्रमाण जास्त असले तरी येथे तीन पिके घेतली जातात. त्यात दोन वेळेस भात व एक वेळी मका, भाजीपाला, सरसो ही पिके घेतली जातात. डोंगर उतारावरील शेतीतही किमान दोन पिके घेतातच. शिवाय स्टेप शेतीची माती वाहून जाऊ नये म्हणून केळी, मोसंबी, मालपुवा, आंबा व अति थंड भागात सफरचंदची शेती केली जाते. यामुळे मातीही वाहून जात नाही व अधिकचे उत्पन्न मिळते.
बारमाही नद्यांनी केला प्रदेश सुपीक
या देशात सहा हजाराहून अधिक नद्या असल्या तरी गंडकी, कोसी, दूध कोसी, बागमती या काही प्रमुख नद्या वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक नद्या भारतातील गंगा, यमुना या नद्यांना मिळतात. या नद्या बारमाही असल्याने ज्या-ज्या भागातून, प्रदेशातून वाहतात, त्या-त्या भागातील जमिनीत वर्षभर विविध पिके घेतली जातात.
भात मुख्य पीक, बटाटा शेतीकडे वाढता कल
येथील मुख्य पीक भात असून मका, भाजीपाला, बटाटा व इतर कंदवर्गीय, सत्तू, सरसोंची शेती केली जाते. फळ शेतीमध्ये लिची, आंबा, सफरचंद, केळी व मोसंबी ही मुख्य फळपिके आहेत. काही भागात इतर फळपिकांचेही प्रयोग आता केले जात आहेत. बटाटा शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते.
भाताचे 35 हून अधिक प्रकार; नैसर्गिक सुगंध
भाताचे 35 हून अधिक प्रकार नेपाळमध्ये दिसून येतात. त्यापैकी बासमती, जिरा मथिनो, जेथो पुढो, सोना मनसुले, हायचीन, मार्सी, मलिक हे काही प्रकार आहेत. यातील मर्सी ही फौंटन राईस या नावानेच ओळखली जाते. खम्मल 4, खम्मल 8, मकवानपुरे 8, जार, असीठी या नावाने काही जाती प्रसिद्ध आहेत. या शिवाय इतरही अनेक जाती आहेत. उत्पादन प्रति गुंठा 300 ते 400 किलो मिळते. आपल्याकडे जसे काही सुगंधी भाताचे प्रकार आहेत, तसे येथील प्रत्येक भाताला नैसर्गिक सुगंध आहे. शिवाय रासायनिक कमी व सेंद्रिय प्रमाण जास्त. त्यामुळे हा सुगंध खूप वेळ रेंगाळतो.
समतल आणि स्टेप फार्मिंग
येथे दोन प्रकारची शेत आहे. एक सपाट मैदानावरील शेती (समतल) व दुसरी डोंगर उतारावरील स्टेप फार्मिंग. आपल्याकडे भारतात स्टेप फार्मिंग केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आहे; पण दोन्हीकडे हवामान, माती प्रकार व इतर काही फरक आहेत.
जमीनदारी नाहीच; सर्वाधिक गुंठेधारी 5 एकरवाला
नेपाळमध्ये जमीनदार हा शब्द माहितच नाही. मोठ्यात-मोठा शेतकरी म्हणजे तीन एकर ते अपवादाने पाच एकर भूमीधारक. त्यामुळे येथील शेतकरी गुंठेधारी शेतकरी म्हणून ओळखला जातो. उत्पादनही गुंठेवारीनेच ओळखले जाते.
बैलाऐवजी म्हशीचा वापर; माणसेही ओढतात जू
येथील शेतकरी अतोनात कष्ट करताना दिसतो. येथे शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, म्हणजे डोंगराळ भागातील शेतीत मशीन नेता येत नाहीत. बैलही येथील शेतीत कमी वापरला जातो. नांगरणी म्हशी, हल्या यांच्या मदतीने केली जाते. तर मोगडणी, पाळी, वखरणी, पेरणी ही म्हशी किंवा माणूस स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन करतात. अति दुर्गम भागात तर घरातील कुटुंब स्वतःच सगळी कामे करतात.
वातावरणाला अनुसरून नैसर्गिक शेती
वातावरणाला अनुसरून नैसर्गिक शेती हा प्रकार नेपाळमध्ये अजून टिकून आहे. कारण व्यापारी पिकांचे उत्पादन चांगले मिळत नाही, अन त्यास बाजारही जवळ नसतो. शिवाय अति तीव्र थंडी व वेळी-अवेळी येणार पाऊस यामुळे मेहनत पाण्यात जाते. आता कुठे-कुठे रासायनिक खतांचा वापर सुरु झाला आहे. नाहीतर निसर्ग व काही अंशी सेंद्रिय कर्रब याच्या माध्यमातून शेती पिकवली जाते.
डोंगर उतारावरही काळी माती
नेपाळी शेतकरी दरवर्षी बांधबंदिस्ती करतोच. सेंद्रिय खतासाठी म्हशीचे शेण, इतर कुजलेले शेणखत व काही झाडपाल्याचा वापर केला जातो. यामुळेच की काय जमीनीचा कस टिकून आहे. येथे काळी, भुरकट व काही ठिकाणी लाल माती आहे. विशेष म्हणजे डोंगर उतारावरसुद्धा काळी माती पाहावयास मिळते.
मका, भेंडी, मेथी, टोमॅटो, रानाभाज्यांची लागवड
येथे मका उत्पादन प्रति गुंठा 100 ते 150 किलो आहे. भाजीपालामध्ये भेंडी, मेथी, सरसों, टोमॅटो, ढोबळी मिरची, काही वेलवर्गीय फळभाज्या, काकडी, काही लोकल रानभाज्या घेतल्या जातात. तर बटाटा शेती मोठ्या प्रमाणात होते.
तरुण वर्ग उपजीविकेसाठी परदेशात
मका उत्पादनावर वानरांचा उपद्रव खूप वाढला आहे. त्यामुळे मका उत्पादन 40 टक्के घटले आहे. त्याचा परिणाम येथील शेतीवरच नाही तर युवक वर्गावर झाला आहे. इथला तरुण उद्योग, नोकरी व उपजीविकेसाठी परदेशात चीन, भारत, कोरिया, जपान व इंग्लंडमध्ये गेला आहे.
डोंगर शेतीत मल्चिंग पेपरचा वापर
भारताप्रमाणेच येथेही शेतीचे अनेक प्रश्न व अडचणी आहेत. माकडांचा उपद्रव, जंगली प्राणी, हत्ती, रानडुकरे अशा प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, त्याला येथील शेतकरी हिमतीने तोंड देतो. विविध स्थानिक उपायांचा वापर तो करतो. जगातील शेतकरी आधुनिकतेकडे वळतो आहे. नेपाळी त्याला अपवाद नाही. विशेषतः डोंगर शेती करणारा शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करून किमान दोन पिके मल्चिंगवर घेतो आहे. भाजीपाला पिके पेपरवर घेतो. काही ठिकाणी नवनवीन शेतीचे प्रयोग केले जात आहेत. अर्थात आताशी सुरुवात आहे.
नेपाळमध्ये जात नाही; पण 30 प्रकारचे गट
या शिवाय येथील अत्यंत डोंगरी, पर्वत शृंखलेतील आदिवासी समाजाचीही शेतीमध्ये मोलाची मदत होते. तत्पूर्वी, नेपाळमधील काही जातींची माहिती बघूया. नेपाळमध्ये 30 प्रकारचे गट आहेत. तशी येथे जात पाळली जात नाही, त्यामुळे समाज हा गटात विभागला आहे. त्यापैकी काही गट असे – क्षेत्री (पर्वतीय व पहाडी, क्षत्रिय) बाहुलं (पहाडी ब्राह्मण, मगर, मारू नेवार, गुरुंग, तमाद, किर्ररीत राई, लिंबू, यादव, शेर्पा, नेपाळी मिया इ.) यातील नेपाळी व शेर्पा याना आपण ओळखतो. कारण हे आपल्याकडे गुरखा, गस्त घालणारे व रखवालदार म्हणून काम करतात. तर नेपाळमध्येही सर्वजण स्थळानुरूप कामे करतात.
शेती, पर्यटन हेच नेपाळचे मुख्य उत्पन्न स्त्रोत
नेपाळच्या उत्पन्नाचे प्रमुख दोनच व्यवसाय आहेत 60 टक्के शेती व 40 टक्के पर्यटन. एकूण शेती करणार्यांपैकी 90 टक्के लोक शेती करतात. यातील अति दुर्गम भागातील अति मागासवर्गीय मानव निसर्गसंपदेच्या शेतीतून आपला उदरनिर्वाह चालवतो. मात्र, हे खरे अति कष्ट करणारे शेतकरी! यांची कष्टाची शेती आपण जाणून घेऊ नेपाळमधील अति दुर्गम भागात हिमाच्छादित भागात काही लोक राहतात. हा भाग जंगले व सहा महिने बर्फाने झाकलेला असतो. अपवादाने येथेही भात शेतीचा एक हंगाम घेतला जातो. उत्पन्न फारसे मिळत नाही. पोटापुरता भात पिकतो. मात्र, मोठ्या कुटुंबास तो पुरत नाही. त्यामुळे येथे कुक्कुटपालन, शेळी पालन, वराह पालनचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. पावसाळा संपल्यानंतर येथील रहिवासी जंगलात जाऊन वनस्पती, जंगली फळे, औषधी वनस्पती गोळा करून आणून संग्रही ठेवतात.
रुद्राक्ष गोळा करून मिळवितात उत्पन्न
या पर्वतीय भागात मोठी मोठी जंगले आहेत. यातच रुद्राक्षची मोठी झाडे आहेत. याचाही हंगाम असतो. त्या-त्या वेळी झाडाखाली जाऊन रुद्राक्ष गोळा करून आणले जाते. हे कच्चे असते. त्यावरील हिरवी साल पाण्यात धुऊन काढली जाते. नंतर रुद्राक्ष मिळते. हे चार रंगात मिळते. पांढरा, लाल, लालसर करडा व कृष्ण वर्णीय. याचे प्रकारही अनेक आहेत. जसे एकमुखी, तीन मुखी, पंचमुखी बहुमुखी.
एकमुखी रुद्राक्षला सोन्याचा भाव
हिंदू संस्कृतीत रुद्राक्षला फार महत्वाचे स्थान आहे. त्यातही एकमुखी रुद्राक्षला सोन्याचा भाव मिळतो. शेतकरी हे रुद्राक्ष प्रतवारीनुसार वेगवेगळे करतो व काठमांडूमधील बाजारात नेऊन विकतो. याच दुर्गम भागात ट्रायफिना हे अति दुर्मिळ मशरूम मिळते. तेही जमा करून विकले जाते. याशिवाय अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती मिळतात. त्यांचेही संकलन करून विक्री केली जाते. यातून या लोकांचे वर्षभराचे उत्पन्न भागते. हे नागरिक सातू, चुडा, खोले व भात हे शाकाहारी व अनेक मांसाहारी पदार्थ खातात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनही येथे मोठ्या प्रमाणात होते.
लिची, सुपारी, आंबा फळबागा; शेडनेट फार्मिंग
संपूर्ण नेपाळमधील शेतकर्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी येथे कृषी विकास बँक कार्यरत आहे. त्यामुळे या भागात लिची, सुपारी, आंबा यांच्या फळबागा आता दिसू लागल्या आहेत. याशिवाय, केळी, अद्रक, बटाटा ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. अनेक ठिकाणी शेडनेट फार्मिंगसुद्धा सुरु झाले आहे.