ही यशोगाथा आहे केरळ राज्यातील पर्यटनस्थळ अलाप्पुझाजवळील कुट्टानाड येथील 15 वर्षांच्या लहानग्याची! त्याची आई मनरेगा कामगार. या शाळकरी मुलाने पुराशी झुंज देणाऱ्या शेतीचे शाश्वत मॉडेल विकसित केले आहे. त्याला केरळ सरकारच्या कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
कुट्टनाड जिल्ह्यामधील मिश्राकरी येथील अर्जुन अशोक या पंधरा वर्षीय मुलाने केरळ राज्यातील कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे निर्माण झालेल्या आव्हानांशी झुंज देत त्याने शेतीतील यशोगाथा लिहिली. त्याच्या मॉडेलने सततच्या पुरामुळे शेतीत नुकसान सहन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.
लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे अर्जुन लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे ओढला गेला, त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो म्हणतो, “अगदी लहान वयातच शेतीची पहिली पायरी मी आईकडून शिकलो. मनरेगा कामगार असलेल्या माझ्या आईने माझी शेतीची आवड ओळखली आणि मला प्रोत्साहन दिले. मी वयाच्या दहाव्या वर्षीच छोट्या प्रमाणात का होईना, पण स्वतः भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली.”
कोविड-19 महामारीने दिली शेतीची संधी
जेव्हा कोविड-19 महामारीमुळे शाळा बंद कराव्या लागल्या होत्या, तेव्हा अर्जुनाने त्याच्या मोकळ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग शेती आणि नवे शेती तंत्र समजून घेण्यासाठी केला. मिश्राकरीच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या अर्जुनसाठी आज शालेय शिक्षण आणि शेती तितकीच महत्त्वाची आहे.
संकटांनी डगमगला नाही
शेतीबद्दलच्या त्यांच्या आवडीमुळे अर्जुनाने अत्यंत कठीण संकटांवरही विजय मिळवला. त्याने काही महिन्यांपूर्वी ओणम डोळ्यासमोर ठेवून भाजीपाला आणि झेंडूची लागवड केली होती. जुलैमध्ये कुट्टनाडमध्ये आलेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्यांची अनेक झाडे नष्ट झाली. अर्थात पुराचा शेतीवर परिणाम होण्याची ही काही त्याच्यासाठी पहिलीच वेळ नव्हती. नुकसान झाले, पण यामुळे त्याचा निर्धार दृढ झाला. पुरानंतर त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि पालक, भेंडी, वांगी, सोयाबीन आणि करडईची लागवड केली. यासाठी त्याला कृषी विभागाने दिलेली मदत प्रेरणादायी असल्याचे अर्जुन आवर्जून सांगतो.
‘ग्रो बॅग ‘मध्ये लागवड ग्रो बॅग म्हणजे उगवत्या पिशव्यांमध्ये आता अर्जुन काही भाज्यांची लागवड करत आहे.
शेळ्या, ससे, कोंबड्या पालन अन् रेशीम शेती
आज, हा विद्यार्थी शेतकरी घरच्या सुमारे 50 टक्के जमिनीवर विविध प्रकारच्या भाज्या आणि फुलांची लागवड करतो. त्याच्या कौटुंबिक जमिनीसह त्याचे काही नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मालकीची जमीनही तो या वयात कसत आहे. मुख्यतः स्वयंपाकघर आणि जनावरांच्या कचऱ्यापासून तयार होणारी जैवकीटकनाशके आणि कंपोस्ट खत तो तयार करतो. पाणी साचवून त्याने छोटे शेततळे तयार केले आहे. याशिवाय शेळ्या, ससे, कोंबड्या पाळल्या असून अर्जुन थोडी रेशीम शेतीही करत आहे.
पुराचा फटका बसू नये म्हणून प्रायोगिक तत्त्वावर लाकडी प्लॅटफॉर्मवर ‘ग्रो बॅग’मध्ये झेंडूची लागवड केली जात आहे. हा शाळकरी शेतकरी प्रामुख्याने स्थानिक बाजार समितीत आणि आठवडे बाजारात शेतमालाची स्वतः विक्री करतो. विक्रीतून मिळालेली रक्कम त्याच्याच बँक खात्यात जमा करतो.
कीटकनाशकमुक्त उत्पादन
अर्जुनने लहान वयातच शेतीला सुरुवात केली होती. तो जवळजवळ एकट्यानेच शेती करत आहे. रासायनिक कीटकनाशके न वापरता तो भाजीपाला आणि फुले पिकवतो, असे मुत्तारच्या कृषी अधिकारी लक्ष्मी आर. कृष्णन कौतुकाने सांगतात. त्याचा माल बाजारात चटकन संपतो कारण नागरिकांना त्याच्या मेहनतीची जाण असून कृषी उत्पादनाच्या शुद्धतेची आणि दर्जाची खात्री पटली आहे. अर्जुनला आई शोभा अशोक आणि वडील अशोक कुमार यांनी साथ दिली आहे.