भारतीय हवामान खातं म्हणजेच आयएमडीकडून (IMD) राज्यात तीव्र उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेची लाट असताना महत्त्वाच्या कामाशिवाय शेतकऱ्यांनीही उन्हात फिरू नये, असा इशारा देण्यात आला आहे. (Heat Wave Weather Alert)
विदर्भात आज, शनिवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील तीन दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील दोन दिवस पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. पुण्यासह संपूर्ण राज्यात येत्या 15 दिवसांमध्ये उष्णतेची लाट पसरणार आहे. नाशिक, जळगावमध्येही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेमध्ये वाढ होताना दिसतेय. केवळ दिवसाच नाही तर रात्री देखील उन्हाच्या झळा अनुभवायला मिळतायत. सोलापुरात शुक्रवारी राज्यातलं सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झालं. अनेक शहरातही किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं जास्त राहिलं. येत्या मंगळवारी चांगला पाऊस झाल्यास कमाल तापमानात किंचित घट होऊ शकते.
IMD Heat Wave Weather Alert
सध्यातरी, दुपारी 12 ते 3 वेळेत फार महत्त्वाचं काम नसेल तर अजिबात बाहेर पडू नका. प्रत्येकानं स्वत: चं रक्षण करा, असा सल्ला पुणे वेधशाळेनं दिला आहे. दुसरीकडं, सध्या मुंबई उष्णतेच्या लाटेच्या श्रेणीत नसल्याचं आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं आहे. लोकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी. बाहेर जाताना गॉगल वापरावा आणि भरपूर पाणी पीत राहावं, असा सल्ला कांबळे यांनी दिला.