मुंबई : मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 4-5 दिवस कोकणात जोरदार, राज्यात मध्यम, तर खान्देशात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या 24 तासात गोवा, सिंधूदुर्ग भागात मुसऴधार ते अतिमुसऴधार पाऊस झाला. येत्या 3-4 दिवस किनारपट्टी भागात हीच स्थिती कायम राहू शकेल.
कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे पुणे वेधशाळेचे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही पुढील 4-5 दिवस मध्यम पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याशिवाय, आज, 14 जुलै रोजी सकाळी मुंबई, ठाणे परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
पेरणी करून ढगांकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला हवामान खात्याने आता पुन्हा एकदा सुखद वार्ता दिली आहे. पुढील आठ दिवसांत कमी-अधिक फरकाने उत्तर व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पीके तग धरण्यास मदत होऊ शकेल.
पुढचे 4,5 दिवस राज्यात पावसाचे असून कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा व इतर काही भागात मेघगर्जनेसह पाउस पडण्याचे “आयएमडी”चे अनुमान आहे.
राज्यातील आजचे पावसाचे अलर्ट
संपूर्ण विदर्भ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी आज हवामान खात्यातर्फे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील गेल्या 24 तासातील पाऊस
पाचोरा – 28 मिलिमीटर, पारोळा – 18, चाळीसगाव – 17, रावेर – 12, चोपडा – 7, मुक्ताईनगर – 6, जळगाव – 4, एरंडोल – 2, जामनेर – 1 मिमी.
सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यात 100 मिमीहून अधिक पाऊस झाला. रामेश्वर ॲग्रीने परिसरात राज्यातील सर्वाधिक 152 मिमी.पाऊस नोंदविला. उर्वरित राज्यात, गेल्या 24 तासात माथेरानमध्ये सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला.
हवामान खात्याने 13 ते 16 जुलै दरम्यान एकत्रित तीन दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. IMD GSF मॉडेल निरीक्षणानुसार, कोकण, विदर्भ आणि अजिंठा परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. वरील छायाचित्रातील गडद निळ्या भागात, तीन दिवसात, सरासरी 70 ते 130 मिमी पाऊस होऊ शकेल. फिकट निळ्या भागात 40 ते 70 मिमी, गडद हिरव्या भागात 20 ते 40 मिमी, फिकट हिरव्या भागात 10 ते 20 मिमी आणि पिवळ्या भागात 1 ते 10 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे.
खान्देशात चांगल्या पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार, (Extended Range Weather Forecast) पुढील 2 आठवडे (14 ते 27 जुलै दरम्यान) महाराष्ट्रासह खान्देशात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नंदुरबारमधील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सचिन फड यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले.