छत्रपती संभाजीनगर : कृषी क्षेत्रात सध्या आशादायक चित्र पहावयास मिळत आहे. ते म्हणजे उच्च शिक्षित तरुणांचा शेतीकडे वाढता कल. आजचा उच्च शिक्षित तरुण आपले कौशल्य, शिक्षणाचा वापर करुन शेतात नवनवीन प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेत आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील हर्षी येथील कृष्णा आगळे या उच्च शिक्षित शेतकर्याने देखील आपल्या शेतात एक यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी शासकीय योजनेतून शेड नेट हाऊस उभारुन 40 गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. आज ते एकरी 2 लाखांंचे उत्पन्न घेत असून शिमला मिरचीने त्यांच्या जिवनात गोडवा आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हर्षी गावात कृष्णा आगळे हे कुटूंबासह वास्तव्यास असून त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांचे शिक्षण बी.ए पर्यंत झालेले असतांनाही त्यांनी शेती करण्यालाच प्राधान्य दिले. शेती कामामध्ये त्यांची पत्नी जयश्री आगळे व आई-वडील यांची मोठी मदत होत असते. आगळे सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करतोय. आधीच पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
पारंपारिक पिकाला फाटा
आगळे यांच्या शेतातील बोअरवेल, विहीरीला अल्पप्रमाणात पाणी होते. त्यामुळे पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गेल्या काही वर्षांपासून पावसाची देखील अनियमितता असल्याने उत्पादन खर्च जास्त होवून उत्पन्न कमी होत होते. यावर रडत बसण्यापेक्षा शेतात काही तरी नविन प्रयोग करण्याचा विचार आगळे यांनी केला व शिमला मिरची लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सर्वात आधी कृष्णा यांनी शासकीय योजनांची माहिती घेतली. त्यानंतर शिमला मिरची लावण्यासाठी कृषी विभागाकडे 40 गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभारण्यासाठी पाठपुरावा केला व शेडनेट उभे केले. या शेड हाऊसमध्ये त्यांनी शिमला मिरचीची 8 हजार रोपे आणून लावली.
राज्यासह परराज्यात मिरचीची विक्री
शिमला मिरचीची लागवड केल्यानंतर काही महिन्यापासून उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. कृष्णा यांचा शेतमाल हा पुणे, परभणी, नांदेड, हिंगोली यासह सुरतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. आगामी काळात 18 ते 20 टन उत्पादन अपेक्षित असल्याचे ते सांगतात.
सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न
कृष्णा यांना शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. आता मिळत असलेला दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न यातून मिळणार असल्याचे कृष्णा आगळे सांगतात.