पुणे : पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाला आहे. त्यानंतर प्रशासनाने तालुक्यातील बाजार बंद केले असून पशुधन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार थांबविले आहेत. उत्तर भारतात जनावरांमध्ये ही साथ आली असून ती वेगाने लगतच्या राज्यातून फैलावत असल्याचे वृत्त सर्वप्रथम 20 जुलै रोजीच देऊन “ॲग्रोवर्ल्ड”ने राज्यातील शेतकऱ्यांना खबरदार केले होते. उत्तरेतील राज्ये विशेषत: राजस्थानातून पशुधन खरेदीचे व्यवहार करू नयेत, असे “ॲग्रोवर्ल्ड”ने स्पष्टपणे सुचविले होते.
जनावरांची वाहतूक, जत्रा-प्रदर्शन, बैलांच्या शर्यतीवर प्रतिबंध.
जुन्नर तालुक्यातील मांडवे, कोपरे येथे जनावरांत लम्पी स्किन साथीचे केंद्र आहे. या दोन्ही गावांच्या दहा किलोमीटर परिसरातील जनावरांचे खरेदी विक्री बाजार, जनावरांची वाहतूक, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध केला आहे.
जुन्नर तालुक्यातील मांडवे गावातून साथीचा फैलाव
पुणे जिल्ह्यात आठवडाभरापूर्वीच ‘लम्पी स्किन’ची साथ आल्याचे दिसून आले होते. जुन्नर तालुक्यातील मांडवे या गावी आठ जनावरांना लम्पी स्किन हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मांडवे गावानंतर कोपरे आणि जांभूळशी गावासह वाड्यावस्त्यांवरील जनावरांना लम्पी स्किन झाल्याचे समोर आले होते. मांडवे वगळता इतर सोळा जनावरे बाधित आढळून आली होती. त्यानंतर लसीकरणासाठी नऊ पथके तयार करण्यात आली होती. तत्काळ परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात साथीचे मूळ
अहमनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात यापूर्वी जनावरे बाधित झालेली आढळून आली होती. अकोले तालुक्यातूनच लगत असलेल्या जुन्नरमधील गावांमध्ये प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी पशुसंवर्धन विभागाची नऊ पथके तयार करून जुन्नर तालुक्यात दोन हजारहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण केले होते. तरीही अखेर तालुक्यातील मांडवे गावातील एका बैलाचा लम्पी स्किनने मृत्यू झाला. हा पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिला मृत्यू ठरला आहे.
नगर, धुळे जिल्ह्यातील जनावरातही साथ
राज्यात सध्या पुण्यासह अहमदनगर, धुळे या जिल्ह्यांत लंपी स्किन या रोगांची मोठ्या प्रमाणावर पशुधनास लागण होत असल्याचे दिसून येत आहे. राजस्थान, गुजरातमध्ये या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण झालेली असून मोठ्या प्रमाणावर पशुधनही दगावल्याचे समोर आले आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, नाशिक जिल्ह्यातून ही साथ राज्यात शिरू पाहत आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने जनावरांना तत्काळ द्या ‘लंपी स्किन’ प्रतिरोधक लस देण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात 2020 मध्येही पशुधनास झाली होती लागण
महाराष्ट्रात 2020 मध्येही या रोगाची पशुधनास लागण झाली होती. मात्र, वेळीच पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना केल्याने त्या वेळी या रोगाची साथ आटोक्यात आणण्यात यश आले होते. जनावरांना ताप येण्यामुळे दूध उत्पादन घटण्याची शक्यता राहते. अशा जनावरांना प्रतिजैविके, इंजेक्शन इवरमेक्टिन व जनावरांना तापाची औषधे देणे आवश्यक आहे . या विषाणूजन्य रोगावर लस उपलब्ध आहे. जनावरांचे लसीकरण केल्यानंतर 15 ते 20 दिवसांत त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ही लस सर्वत्र उपलब्ध असून शेतकर्यांनी घाबरून न जाता आपापल्या जनावरांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाने केले आहे.
आजारामुळे जनावरे अशक्त
लंपी स्कीन व्हायरस या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होतात. त्याचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगाचा प्रसार साधारण 10 ते 20 टक्के जनावरांमध्ये होतो. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड आर्दीमार्फत होतो. उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो.
‘लम्पी स्कीन व्हायरस’ची लक्षणे
गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. जनावरांचे दूध उत्पादन घटते. या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसतात. नंतर जनावराच्या अंगावर विशेष करून डोके, मान, मायांग, कास, पोटाकडील भाग आदी ठिकाणी 2 ते 5 सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात.
जनावरांत प्रादुर्भाव झाल्यास असा करा प्रतिबंध
• निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
• प्रसार बाह्य किटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर, तसेच गोठ्यात डास, माशा, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी औषधांची फवारणी करावी.
• गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये.
• साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश टाळावा.
• गोठ्यास भेटी देणार्यांची संख्या मर्यादित असावी.
• जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी आठ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
• बाधित क्षेत्रात गाई- म्हशींची विक्री, पशू बाजारात जाणे टाळावे.
• बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत.
• लम्पी स्किनचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ
नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments 5