पुणे : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू जन्माला घातले गेले आहे. त्याचे वजन 27 किलो आहे. गायीच्या देशी जातींना प्रोत्साहन देणाऱ्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची धडपड फळाला येणे, ही सरकारी क्षेत्रातील कृषी विषयात समर्पित व ध्येयनिष्ठ कामाचे अलीकडच्या काळातील एक दुर्मीळ उदाहरण ठरावे.
देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे सातत्याने नवनवीन संकल्पनांवर काम सुरू आहे. सरकारी संशोधन हे अधिक शेतकरीपूरक व सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारात उपयुक्त ठरणारे असावे, यावर भर दिला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे यांच्याकडून भारतीय गायींच्या विविध जातींच्या संशोधनाकरिता देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा प्रकल्प राबविला जात आहे.
मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी ; असा घ्या मधकेंद्र योजनेचा लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/TgyUpPxd5Ao
आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू : देशात प्रथमच सरकारी पातळीवर यशस्वी प्रयोग
या केंद्रातर्फे गेल्या काही वर्षांपासून देशी गोवंश संवर्धन आणि संशोधनाला चालना दिली जात आहे. त्याच धडपडीतून केंद्राच्या आवारातील गोशाळेत ओव्हम पिक अप आणि इन व्हिट्रो फर्टिलायझेशन अर्थात ओपीयू आयव्हीएफ तंत्राद्वारे देशात प्रथमच सरकारी पातळीवर ‘साहिवाल’ नावाच्या देशी गायीची निर्मिती केली आहे. थोडक्यात सांगायचे तर टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने देशी गायीला जन्म देण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.
राज्यातील प्रयोगशील पशुपालकांना प्रशिक्षण
देशात जातिवंत दुधाळ देशी गायी तसेच पैदाशीचे वळू दुर्मीळ होत असल्यामुळे राज्य आणि विभागनिहाय जातींचे संवर्धन फार महत्त्वाचे आहे. देशी गोवंश संवर्धनाला शास्त्रीय पद्धतीने चालना देण्यासाठी देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे राज्यातील प्रयोगशील पशुपालकांना प्रशिक्षणही देते. त्यासाठी देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातर्फे गोधन प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
टेस्ट ट्यूब बेबी वासराचे वजन 27 किलो
प्रथमच, पुणे कृषी महाविद्यालयाने स्वतःच्या आवारात ओव्हम पिक-अप आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (ओपीयू आयव्हीएफ) तंत्राद्वारे ‘साहिवाल’ नावाच्या देशी गायीची निर्मिती केली आहे. शुक्रवारी सकाळी 9.45 वाजता या तंत्राचा वापर करून हे वासरू जन्माला आल्याचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद साखरे व शास्त्रज्ञ डॉ. धीरज कणखरे यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले. ‘साहिवाल’ जातीच्या या टेस्ट ट्यूब बेबी वासराचे वजन 27 किलो आहे.
शेतकरी स्तरावर 150 देशी गाय गर्भधारणा
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रकल्प प्रभारी डॉ. सोमनाथ माने म्हणाले, “हा एक क्रांतिकारी टप्पा आहे आणि त्यामुळे देशात अधिकाधिक देशी गायींना प्रोत्साहन मिळेल. काही संकरित प्रजनन प्रयोग केले गेले आहेत; परंतु विद्यापीठ स्तरावर देशी जातीची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र सरकारने स्थानिक प्रजातींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून, साहिवाल गिर राठी लाल सिंधी गायी गर्भधारणा 150 शेतकरी स्तरावर केल्या जाणार आहेत.”
काय आहे गायीमधील ओपीयू आयव्हीएफ तंत्र
ओपीयू आयव्हीएफ तंत्राचा वापर करून, सशक्त गायीतून घेतलेले बीजांड त्याच जातीच्या गायीमध्ये वाढवले जाते, जे नंतर वासराला जन्म देते. भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान स्वदेशी जातींचे उत्पादन करण्यास मदत करेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. स्थानिक जातीचे चांगले दूध मिळाल्याने नागरिकांनाही फायदा होईल. हे तंत्रज्ञान केवळ लॅब चाचण्या आणि विद्यापीठांपुरते मर्यादित न ठेवता, राज्य सरकारने ते शेतकरी स्तरावर विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशी जातीचे दूध चांगले आले तर शेतकरी या गायी पाळण्यास प्राधान्य देतील, असे डॉ. माने यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले.
महाराष्ट्रातील देशी गायींची स्थिती तुलनेने चांगली
देशातील गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, आणि हरियाणा या राज्यातील पारंपरिक देशी गायींच्या जाती नष्ट होत आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्रातील देशी गायींची स्थिती तुलनेने बरीच चांगली आहे. देशी गायींच्या 6-7 प्रजाती महाराष्ट्रात अजूनही तग धरून आहेत. मात्र, आता या गायींच संवर्धन होणे गरजेचे आहे. हिंदू धर्म संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान आहे. समाजाला अत्यंत उपयुक्त पशू म्हणून गाय पूजली जाते. आरोग्य व धार्मिक क्षेत्रात गायीचे अनेक प्रकारे उत्तम लाभ मिळतात. त्यातूनच हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान देण्यात आले आहे.
भारतातील दुधाळ, जातिवंत देशी गोवंश
भारतातील दुधाळ, जातिवंत देशी गोवंश म्हणून गीर,साहिवाल, रेड सिंधी, थारपारकर, राठी या जातीच्या पशुंची ओळख आहे. याशिवाय, कोकण कपिला, डांगी, लाल कंधारी, गवळाऊ आणि देवणी याही उत्तम देशी जाती आहेत.
महत्त्वाकांक्षी गो परिक्रमा, गो पर्यटन प्रकल्प
राहुरी कृषी विद्यापीठाच्या देशी गोवंश संशोधन केंद्रात गाय गोठा व्यवस्थापन याबरोबरच दुग्ध उत्पादन तसेच दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या विविध तंत्राची माहिती शेतकऱ्यांना, पशुपालकांना दिली जाते. संस्थेत गो परिक्रमा या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते याच वर्षी उद्घाटन झाले आहे.
त्यातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांनाही गायीची महती कळू शकेल. लवकरच संस्थेतर्फे गो पर्यटन उपक्रम राबविला जाणार आहे. संस्थेच्या आवारात महाउर्जा अर्थात महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या इरेडा नियंत्रित सरकारी एजन्सीमार्फत चाळीस किलो वॉट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही डॉ. धीरज कणखरे यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला दिली.
राहुरी कृषी विद्यापीठाकडून उपयुक्त मार्गदर्शन
देशी गायींचे संगोपन, व्यवस्थापन, पशुखाद्य निर्मिती पद्धती, विविध चारा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, मुरघास प्रक्रिया तंत्रज्ञान, स्वच्छ दुध उत्पादन व विक्री व्यवस्थापन, दुग्धजन्य पदार्थ व उत्पादन तंत्रज्ञान व दुधाचे मूल्यवर्धन, शेण व गोमूत्रापासून जैविक मिश्रण, बायो-स्लरी, गोखूर खत, गांडूळ खत निर्मिती व व्हर्मिवाँश उत्पादन, शेणापासून रोपांसाठी कुंड्या, पणत्या, मूर्ती, भेटवस्तू इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती, आधुनिक बायोगॅस उत्पादनाची पद्धत, विविध कृषी औजारे व यंत्रे,शेती व पशुपालनामध्ये सौर उर्जेचा वापर अशा अनेक बाबतीत देशी गोवंश प्रशिक्षण केंद्रातर्फे शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन सातत्याने केले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्प प्रभारी डॉ. सोमनाथ माने यांच्या मार्गदर्शनात शास्त्रज्ञ डॉ. धीरज कणखरे व डॉ. प्रमोद साखरे त्यासाठी प्रयत्नशील असतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ आली महाराष्ट्रात, राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यात ; “ॲग्रोवर्ल्ड”ने महिनाभरापूर्वी केले होते खबरदार
- Animal Insurance | केंद्र सरकारची पशुधन विमा योजना
नमस्कार भाऊ.माझ्याकडेही देशी गाईने टेस्ट ट्यूब ने सहिवाल जातीच्या वासरीला जन्म दिला आहे.आता ती वासरी (कालवड) सात महिन्यांची आहे.
व्वा अतिशय उत्तम ….
आपण आपले अनुभव पाठवावेत. राहुरी कृषी विद्यापीठात संबंधितांपर्यंतही पोहोचवू.
जळगावात असल्यास ॲग्रोवर्ल्ड कार्यालयास भेट द्यावी. अधिक चर्चा करता येईल.
धन्यवाद.