राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून आयएएस प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिव म्हणून बदली झाली आहे. गेडाम यांनी अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत.
डॉ. गेडाम यांचा वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न अतिशय गाजला होता. त्यांनी उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, जळगाव, नाशिकसह विविध शहरात काम केले आहे. अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. जळगावातील घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक नेत्यांना गेडाम यांच्या खंबीर भूमिकेमुळे जेलची हवा खावी लागली आहे. नाशिकमधील बिल्डर लॉबीच्या मनमानीलाही त्यांनी चाप लावला होता. जनताभिमुख प्रशासन ही त्यांची कार्यशैली पंतप्रधानांनाही भावली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मर्जीतले अधिकारी
मोदी सरकारने डॉ. गेडाम यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ, एनएचए) म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ही सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे ते राज्याच्या आरोग्य विभागात दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
एनएचए सीईओपदाला अलीकडेच दिली होती मुदतवाढ
खरेतर, डॉ. गेडाम यांना केंद्रातील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ मोदी सरकारने गेल्याच महिन्यात 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवून दिला होता. त्यामुळे आता अचानक महाराष्ट्रात कृषी खात्याचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. राजकीय अनिश्चिततेच्या स्थितीत गटांगळ्या खाणाऱ्या राज्यातील कृषी क्षेत्राला योग्य मार्गावर आणण्याचे मुख्य आव्हान आता डॉ. गेडाम यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय केंद्रातील कृषी योजना राज्यात यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागेल.
राज्यात अचानक कृषी विभागात नियुक्तीने अनेकांना धक्का
सध्या पंतप्रधान मोदी यांचे सर्वाधिक लक्ष हे कृषी खात्यावर केंद्रीत आहे. शेतकरी जीवनमान सुधारावे, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे यासाठी मोदी सरकारची धडपड सुरू आहे. अशात राज्यातील कृषी कारभाराचे गेल्या काही दिवसात पार धिंडवडे निघाले होते. कृषिमंत्री दादा भुसे यांना आपल्या कर्तृत्वाचा फार ठसा उमटवता आला नाही. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या काळात तर खात्याची मोठी बदनामी झाली. अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबलही खच्ची झाले होते. धनंजय मुंडे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर आता त्यांना जोडीला चांगले आयुक्त मिळाले आहेत. अर्थात हे अत्यंत महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीकडे गेल्याने थेट दिल्लीतून त्यावर नियंत्रण ठेवले जाण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
सुनील चव्हाण यांची वर्षभरातच बदली
सुनील चव्हाण यांची गेल्यावर्षीच 22 नोव्हेंबर रोजी कृषी आयुक्त पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या वर्षभराच्या आत त्यांना या पदावरून मंत्रालयात हलविण्यात आले आहे. त्यांना कृषी आयुक्तपदाचा कार्यभार तातडीने सोडून त्वरित मंत्रालयातील मृद व जलसंधारण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. गेडाम यांची नियुक्ती अन् सुनील चव्हाण यांच्या बदलीचा आदेश
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी आज, 19 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात जारी केलेला शासकीय बदली आदेश असा –
श्री. सुनील चव्हाण, भाप्रसे,
आयुक्त, कृषी, पुणे.
प्रिय
शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती, सचिव मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर केली आहे. आपल्या जागी डॉ. प्रवीण गेडाम, भाप्रसे, यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य (कृषी) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्री. एकनाथ डवले, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा.
आपला स्नेहांकित,
नितीन गद्रे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- देशातील पहिले काऊ टुरिझम पुण्यात लवकरच सुरू होणार
- राज्यात लवकरच खासगी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालये