मुंबई : Havaman Andaj… देशात वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने देशातील 12 राज्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा थंडीची लाट येऊ शकते तर 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आजपासून 26 जानेवारीपर्यंत तमिळनाडूसह हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश तसेच उत्तर आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागात होणार पाऊस आणि हिमवृष्टी
पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि गारपिटीसह थंडी वाढण्याची शक्यता आहे. 26 जानेवारीलाही ढग मुसळधार पाऊस पाडतील. पुढील 24 ते 48 तासांत गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. 24 आणि 25 जानेवारीला जम्मू-काश्मीर-लडाख आणि हिमाचल प्रदेशात तर 25 आणि 26 जानेवारीला उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.
काय सांगतो IMD चा अंदाज
IMD नुसार, 27 जानेवारीपासून वायव्य भारतावर आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे आणि अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागावरही एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 25 जानेवारीला आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 24 जानेवारीला म्हणजेच आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागात आज आणि 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशात गारपीट होऊ शकते. दुसरीकडे, 25 जानेवारीला पश्चिम उत्तर प्रदेशातही गारपीट होऊ शकते.
‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील डझनभर जिल्ह्यांमध्ये पावसाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे अलवर, भरतपूर, हनुमानगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून ते 25 जानेवारीला पाऊस पडू शकतो. छत्तीसगडमध्येही हलके ढग आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण पंजाबमध्ये देखील आजपासून ते 25 जानेवारीला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.