दीपक देशपांडे, पुणे
शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा किंवा पूरक उद्योग सुरू करावा असे सगळे सांगतात. काहीजण तांत्रिक कायदेशीर व यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात पण शेतकरी कितपत यशस्वी होतो हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासह सर्वांनाच पडतो. शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करतो, नियोजन करतो ,विक्री व उत्पादन काढतो पण नेमके शेतकऱ्यांचे उत्पादन बाजारात येते तेव्हा त्या मालाचे भाव पडतात {किंवा पाडले जातात} आणि मग शेतकरी शेती बाबत उदासीन राहतो. नवयुवकांची एक पिढी शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. अशावेळी एखादा युवक ग्रामीण भागातच स्वतः पुढाकार घेत फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत, सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देत, शेतकऱ्यांना मानसिक पाठबळ देत असेल तर तो त्यांच्यासाठी शेतकरी दूत, देवदूत ठरतो. अशा एका बीड जिल्ह्यातील शेतकरी युवकाची यशोशिखराकडे वाटचाल करणारी यशोगाथा आपण पाहणार आहोत..
महाराष्ट्र राज्यात मराठवाडा तसा उपेक्षितच व दुष्काळी म्हणून कायमचा ठसा बसलेला राज्यातील एक विभाग आहे. राज्याचे एकूण चार विभाग पडतात. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सर्वात सधन. या पाठोपाठ कोकण, नंतर विदर्भ व शेवटी मराठवाडा त्यामुळे मराठवाड्याच्या बाबतीत शासकीय, राजकीय व सामाजिक उदासीनता स्वातंत्र्यापासून दिसून आलेली आहे. त्यावर अनेक जणांनी उपाययोजनाचा प्रयत्न केला पण कोणी किंवा परिस्थितीने तो मागेच पडत गेला. अशाच या उपेक्षित मराठवाड्यातील बीड जिल्हा तर अनेक बाबतीत मागासलेला जिल्हा म्हणून पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. कायमचा दुष्काळग्रस्त पाण्याची टंचाई, ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेला हा जिल्हा. बालाघाट डोंगराच्या रांगामध्ये पसरलेला आहे या बालाघाट डोंगररांगा खरेतर सीताफळासाठी खूप प्रसिद्ध आहेत. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी, परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग, धारुरचा किल्ला, बीडचे ऐतिहासिक ठिकाणे अशामुळे यातील जिल्ह्याची ओळख तशी संपूर्ण राज्यात आहे. या अशा दुष्काळी जिल्ह्यातील, बीड तालुक्यातील, बोरखेड पोस्ट अंतर्गत वडवाडी हे जवळपास एक हजार लोकसंख्येचे गाव. हे गाव सोलापूर, धुळे या राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 15 किलोमीटर आतमध्ये आहे. या गावातील एक तरुण दहावीच्या शिक्षणासाठी आपले गाव सोडून इतर गावातून भटकंती करत होता. भटकंती करताना शेतीच्या विविध ठिकाणच्या प्रयोगाची पाहणी व अभ्यास करून त्याची मूळची शेतीबाबत असलेली आवड आणखीन वाढली. शिक्षण पूर्ण होताच स्वतःच्या गावी येऊन 2010 पासून शेती व शेती विषयक पूरक उद्योगांना सुरुवात केली त्या युवकाची कहाणी आपण पाहू..
शेतीसह शेती पूरक उद्योग केले सुरु
बीड तालुक्यातील वडवाडी हे गाव लहान आहे. या गावाला एखादी मोठी नदी नाही, पावसाळ्याच्या काळात हंगामी ओघळ, नाले, नदी वाहतात. या ओढ्या नाल्यावर पाच ते सात किलोमीटर अंतरावर एक तलाव बांधलेला आहे. या तलावाखाली अनेक शेतकऱ्यांनी विहिरी घेतली आहे. तर गावातली पाण्याची पातळी ही अडीचशे फूट असून, गावात विंधन विहिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अशा या गावी अभिमान शाहूराव अवचर हा 42 वर्षीय युवक गाव व परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी झटतो आहे. या युवकाकडे वडिलोपार्जित स्वतःची आठ एकर जमीन आहे, परिसरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी 500 मिलिमीटर च्या आसपास आहे. बालाघाट डोंगराच्या माथ्यावर हे गाव असल्यामुळे या गावासह आजूबाजूच्या गावातून पवन ऊर्जा क्षेत्राचे मोठे जाळे उभे राहत आहे. या वडवाडी गावात राहणाऱ्या नवनिर्मिती करणाऱ्या युवकाचे नाव आहे अभिमान शाहूराव अवचर शिक्षणाच्या बाबतीमध्ये एम ए एम एस डब्ल्यू कृषी पदविका अशा विविध पदव्या याने मिळवलेले आहेत असे असताना सुद्धा शेतीची आवड गप्प बसू देत नव्हती म्हणून घरची वडिलोपार्जित शेती त्यामध्ये प्रयोग सुरू केले. या जमिनीच्या क्षेत्रात २०१० पासून हळूहळू वाढ करून ५० एकर जमीन संपादित {विकत} झाली आहे. शेतीसह शेती पूरक उद्योग सुरू केले.

शिक्षणाच्या काळात एनएसव्ही, म्हणजे नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून शेतीतूनच राष्ट्रसेवा करण्याचे दोन वर्ष काम केले. या काळात विविध कृषी विज्ञान केंद्र कृषी सेवा केंद्र, विविध प्रकारची शेतकरी मंडळे यांना भेटी देत व विविध उपक्रमात सहभागी होत स्वतःच्या शेती सुद्धा चांगले उत्पन्न घेतले. या माध्यमातून क्रियाशील, प्रगतिशील शेतकरी, याचा संपर्क येत गेला. यातूनच मग स्वतःच्या शेतात 2010 ते 2012 मध्ये भाजीपाला नर्सरी चा यशस्वी प्रयोग केला. शिक्षणाच्या काळात बीएससीचा खर्च झेपणार नाही म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करून त्या परीक्षा सुद्धा दिल्या. त्यातून नोकरीसाठी प्रयत्न केले. पण स्पर्धा परीक्षा असो अथवा नोकरी असो दोन्हीमध्ये स्पर्धा खूप होती आणि अशी प्रचंड स्पर्धा असल्याचे जाणवल्यानंतर परत शेतीकडे वळून शेतकऱ्यांसाठी काय करता येईल व आपले उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न सुरू झा यातूनच 2010 मध्ये स्वतःच्या शेतामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, सर्व प्रकारचे सेवा सुविधा व प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे प्रशिक्षण व कृति यांची जोड दिली जाते. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पाहून दि. 20 मार्च 2014 मध्ये बळीराजा कृषी विज्ञान मंडळ या नावाने एक संस्था स्थापन केली. याच्या माध्यमातून शेती विषयक व विविध पूरक उपक्रम आणि प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. त्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन करून मार्गदर्शन, कार्यक्रम महिलांसाठी कुटीर उद्योग व विविध उपक्रम, प्रशिक्षण व मार्गदर्शन. औषधी वनस्पती लागवड, या लागवडीतून शेतकऱ्यांना कायम उत्पन्न मिळवून देण्यासाठी विविध करार केले.
नवीन तंत्रज्ञानाच्या वापराविषयी सखोल मार्गदर्शन
शेतकऱ्यांना शेती उत्पादनाबाबत जागृत करून नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतात वापर कसा करायचा याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यातूनच नवीन ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे मग पाच जानेवारी 2016 मध्ये क्रिएटिव्ह शेतकरी प्रोडूसर कंपनी, या नावाने शासनाकडे अधिकृत नोंदणी (रजिस्टर) करून त्या अंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू केले. पहिल्या वर्षी परिसरातील 700 टन तूर खरेदी करण्यात आली. या विक्रमी खरेदी बद्दल अभिमान अवचार यांना शासनाचा विभागीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना तत्कालीन बीडचे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांच्या हस्ते देण्यात आला. त्यामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्रात शेतकरी महिला यांची गर्दी वाढू लागली. महिलांना मार्गदर्शनासाठी त्यांच्या पत्नी मदत करतात .कारण शेतकऱ्यांचा विश्वास वाढला होता. यातूनच पाच एकर क्षेत्रामध्ये ट्रेनिंग केंद्र व कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र सुरु केले. यांच्या माध्यमातून या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी अद्यावत खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध तज्ञ मार्गदर्शक या कार्यक्रमासाठी बोलावले गेले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधील उत्पादन कसे वाढते याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, शेतांवर भेटी दिल्या.
पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी गावापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटे खाणी तलावाच्या पायथ्याशी 55 फूट खोलीची विहीर घेऊन, चार इंची पाईप द्वारे पाणी आणून एक कोटी लिटर क्षमतेचा साठवण तलावात सोडले. या शेततळ्यात हे पाणी साठवले ते या प्रोजेक्ट व स्वतःसाठी. इतर 25 शेतकऱ्यांना शेततळी घेण्यासाठी प्रवृत्त केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून बीड येथे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे फेडरेशन सुरू केले. या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध कंपनी व बाजारपेठ यांचे बरोबर लिकेज करण्यात आले. दि. 20 एप्रिल 15 मध्ये कंपनी ॲक्ट मध्ये बदल झाले. बीड जिल्ह्यातील पहिल्याच शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना, संस्थेकडे नोंदणी करून बळीराजा कृषी विज्ञान मंडळ अंतर्गत, क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनी म्हणून अधिकृत नोंद करण्यात आली. या कंपनीअंतर्गत वसुंधरा माती पाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, ऑइल मिल व तेल घाणा, निवासी प्रशिक्षण संस्था, बळीराजा देशी गाय संगोपन केंद्र ,ऍग्रो क्लिनिक्स, व ऍग्री बिझिनेस सेन्टर असे विविध उपक्रम सुरु करण्यात आले .कृषी विभागाचा प्रतिसादही चांगला मिळाला.
2015 मध्ये एपीसी व महाएबीसी तर्फे 700 शेतकऱ्यांची सात हजार मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली. याचा एकूण तर टर्नओव्हर साडेचार कोटी रुपयांचा झाला. त्याबरोबरच त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर करार करण्यात आले. हा सुद्धा व्यवहार दरवर्षी अडीच ते तीन कोटी रुपयांचा होतो आहे .आर्थिक आवक चांगली सुरू झाली. म्हणून वेगवेगळे प्रकल्प व विविधांगी प्रयोग करणे सुरू झाले. यामध्ये सेंद्रिय शेती उत्पादन, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, तेलघाणा, शेतकऱ्यांना हरभरा व इतर डाळी करून देणे सुरू केले. या डाळी पॉलिश विरहित असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र उभारले. तर माती पाणी प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये स्वतःच्या शेतामधील माती पाणी बाबत जागरूकता वाढली. त्यातूनच मग गांडूळ खत निर्मिती प्रकल्प , चारा पिके यांचे डेमो प्लॅट परिसरात लावले. तर शेतमालावरील प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत, बाय प्रोडक्शन माध्यमातून तूप , गोमय गणेश. गोबर गॅस ,ऍझोला , हायड्रोपोनिक्स, यांचे उत्पादन व विक्री सुरू केली. शेतकऱ्यांना रेसिड्युफ्री भाजीपाला उत्पादनास प्रवृत्त केले . यासाठी विविध मोठ्या कंपन्यांबरोबर करार करून विक्री व निर्यात याची सांगड घातली आहे .येत्या वर्षात या कंपन्यांबरोबर करार कायमची करून शेतकऱ्यांना हमीभाव कायमस्वरूपी देण्यात येणार आहे.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार
अभिमानाने सांगतात बालाघाट डोंगर पट्ट्यातील 50 गावांमधून सीताफळ उत्पादनाबाबत जागृती करून, उत्पादन घेताना त्या सीताफळांना ऑरगॅनिक सीताफळ असे जिल्हा मानांकन मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. या सीताफळापासून वाय प्रॉडक्ट निर्मिती करून त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. त्याकरिता बीड जिल्ह्यातील पाटोदा ते परळी हा बालाघाट परिसर सुचित करण्यात आला आहे. त्यातील पाच ते दहा हजार शेतकरी संस्थेची जोडण्यात येणार आहेत. भाजीपाल्यास हमीभाव देण्यासाठी कार्य सुरू आहे. आता मोठ्या कोल्ड स्टोरेजचे काम देखील ड्रीम प्रकल्प म्हणून सुरू असून मार्च 2024 पर्यंत हे पूर्ण होणार आहे. त्यामधून जून महिन्यापासून आंबा पल्प, पेरू, जांभुळ व सिताफळ प्रक्रिया यांचे युनिट सुरू होणार आहे. ड्रीम प्रकल्पा अंतर्गत आमचा उद्देश व उद्दिष्ट, शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे हाच आहे. हमीभावानुसारच योजनांची आखणी सुरू असून त्यानुसार योजना राबवून शेतकऱ्यांना, नवयुवकांना परत शेतीशी जोडणे हे मोठे ध्येय आहे.

मागील दोन तीन वर्षापासून वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपयांवरून पाच ते सहा कोटी रुपये पर्यंत गेली आहे .आता पाच ते दहा हजार शेतकरी ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत जोडण्यात येणार असून, त्या माध्यमातून कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासनाचे अनुदान दोन कोटी रुपये व प्रोजेक्टचे मूळ भांडवल तीन कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपये संपूर्ण प्रकल्पात मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत सात विविध विषयातील तज्ञ कर्मचाऱ्यांसह एकूण 13 कर्मचारी कामावर ठेवण्यात आले आहेत. सर्व खर्च वजा जाता 2015 पासून निव्वळ उत्पन्न वार्षिक दहा लाखापासून वाढत जात आहे, संस्थेमध्ये 60 टक्के गुंतवणूक स्वतःची व 40% भागधारक शेतकऱ्यांची आहे. आतापर्यंतचे व्यवहार व प्रत्यक्ष कार्य पाहून अनेक बँका कर्ज देण्यासाठी तयार आहे पण जरुरी पेक्षा जास्त कर्ज सुद्धा घेऊ नये या मताचे अभिमान आहेत .
नवीन शेतकरी व युवकांना संदेश देताना अभिमान अवचार म्हणतात,’ शेतकरी करणारे हे मागे बघून शेती करतात, पुढे म्हणजे, भविष्याकडे पाहत नाहीत. त्यामुळे शेती तोट्यात जाते. आता मात्र आम्ही, आमची माती, पाणी, वातावरण व बाजाराच्या अपेक्षा नुसार शेती करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यानुसार राज्याचा पिक शेतकरी डेटा प्रत्येक महिन्यात संकलित व्हावा त्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर काम करून हा डेटा राज्यस्तरावर सगळीकडे उपलब्ध करून द्यावा. व यानुसारच शेतकर्यानी कार्य करावे, शेती नुकसानीची नसते, शेतीतून फायदा होतो पण इतरांकडे पाहात शेती करण्यात आपले मात्र नुकसान होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा सगळा डेटा पाहून व बाजाराचा अंदाज घेऊन शेती केली तर शेती शेतकऱ्याला कधीही नुकसानीत टाकत नाही. असे अवचर ठामपणे सांगतात.