औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के, 50 टक्के व 75 टक्के एवढे वित्तीय साह्य (अनुदान) सरकारकडून दिले जात आहे.
औषधी वनस्पती पिकांची लागवड प्राधान्याने समूह पद्धतीने करण्यात यावी. समूह निश्चिअती करण्याकरिता औषधी वनस्पती पिकांचे किमान दोन हेक्टार क्षेत्र असावे. यामध्ये साधारणपणे कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा व जास्तीत जास्त तीन गावांचा समावेश असावा.
वैयक्तिक शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी 0.20 हेक्टर असणे आवश्यवक आहे.
बचत गट, एफपीसी, समूह यांना लाभ
समूह हा शक्यतो औषधी वनस्पती प्रजातीनिहाय असावा. प्रजातीनिहाय समूह शक्य् नसल्यास 2 ते 3 प्रजातींचा समावेश असलेल्या एकत्रित लागवडीचा समूह करावा व त्याचे क्षेत्र सलग असावे. आंतरपीक व मिश्र पद्धतीने औषधी वनस्पतीची लागवड अर्थसाह्यासाठी पात्र आहे. या घटक योजनेअंतर्गत औषधी वनस्पती उत्पादक, शेतकरी लागवडदार इ., तसेच औषधी वनस्पती उत्पादक संघ, फेडरेशन, स्वयंसहायता गट, कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ. यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
लागवडपश्चात व्यवस्थापन
वाळवणी गृह : वाळवणी गृह घटकअंतर्गत औषधी वनस्पती काढणी केलेल्या कच्चा माल वाळविणे, याशिवाय उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मालाची स्वच्छता व प्रतवारी करणे शक्यळ होणार आहे. स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था/ सार्वजनिक संस्था यांच्यासाठी या योजनेअंतर्गत 100 टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी क्षेत्रासाठी सदरची योजना बॅंक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थीकरिता 50 टक्के व कमाल 2.50 लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येईल.
साठवण गृह : राज्यातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने साठवण गृह घटक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. औषधी वनस्पतींच्या समूह क्षेत्रांमध्ये वाळवणी गृहांची, तसेच साठवण गृहांची योजना राबविली जाते. सदर साठवण गृह हे वाळवणी गृह व प्रक्रिया केंद्र यामध्ये दुवा साधण्याचे काम करणार आहे.
या योजनेअंतर्गत स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था यांच्यासाठी 100 टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळते.